Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik constituency 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तरी उमेदवार जाहीर करतील का?

Nashik Lok Sabha News : महायुतीचा जागावाटपातील तिढा नाशिक मतदारसंघाचे राजकारण बिघडवणार.भारतीय जनता पक्षाचाही अजित पवार गटाला छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. त्याचा मोठा राजकीय परिणाम नाशिकच्या निवडणूक प्रचारावर दिसून येतो

Sampat Devgire

CM Eknath Shinde News: पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली. नाशिक मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. मात्र अद्याप महायुतीने नाशिकची जागा आणि येथील उमेदवार याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. हा राजकीय तिढा केव्हा सुटणार याची प्रतीक्षा आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय म्हणून राज्यातील ठाणे आणि नाशिक हे दोन्ही मतदार संघ व तेथील उमेदवारीचा निर्णय रखडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने नाशिक मतदार संघाचा हट्ट कायम ठेवला आहे. भारतीय जनता पक्षाचाही अजित पवार गटाला छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. त्याचा मोठा राजकीय परिणाम नाशिकच्या निवडणूक प्रचारावर दिसून येतो

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार म्हणून प्रारंभी राज्याच्या नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चर्चेत होते. भुजबळ यांनी आता उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र, या जागेवरील त्यांचा रस कमी झालेला नाही. पडद्यामागून सूत्र हलविण्यात भुजबळ यांची यंत्रणा व्यस्त आहे. या सर्व वादात शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची अपेक्षित असलेली उमेदवारीची घोषणा सातत्याने लांबत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत. सगळ्यांनाच आता उमेदवारीची घोषणा केव्हा होणार याची प्रतीक्षा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव भुजबळ यांनी पुढे केले आहे. कोकाटे यांच्या अपेक्षा देखील आता वाढल्या आहेत. त्यांनी पक्षाने संधी दिल्यास उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोकाटे यांच्यावर त्यांच्या कटवर्तीयांचा देखील दबाव आहे. कोकाटे यांना विरोध झाल्यास ऐनवेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून भुजबळ यांच्या अनुषा शेफाली भुजबळ यांचे नाव घेतले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आता उमेदवारी जाहीर झाल्यास निवडणुकीत उतरण्याची तयारी व क्षमता असलेल्या नेत्यालाच संधी द्यावी असा आग्रह करीत आहेत.

या सर्व स्थितीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाला पद्धतशीर ट्रेक केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सातत्याने नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी देखील या संदर्भात वक्तव्य केले आहे. त्या स्थितीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार असतील. मात्र मुख्यमंत्री शिंदे विविध माहिती देत असले तरीही, प्रत्यक्ष उमेदवारीची घोषणा आज तरी करतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. महायुतीतील हा गोंधळ सहकारी पक्षांना व त्यांच्या उमेदवारला अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT