corporator Suvarna Matale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : लग्न मंडपामुळे ट्रॅफिक जाम; पोलिस कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेविकेवर थेट गुन्हा दाखल

Nashik corporator Suvarna Matale FIR : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयिताला चिथावणी दिल्याप्रकरणी नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकच्या कामटवाडा परिसरातील वृंदावननगरमध्ये लग्न मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी वाहतूक कोडींची तक्रार सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाशी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी वाद घातला. त्यामुळे मटाले यांच्यासह आयोजकावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड पोलिस ठाण्याचे अंमलदार नितीनकुमार वसंत पाटील यांनी स्वत: यासंदर्भात फिर्यादी दिली असून त्यानुसार, कामटवाडा भागातील वृंदावननगरमधील दादाजी भामरे यांच्या घरी विवाह सोहळा होता. शनिवारी (दि. २) त्यांच्या गजलक्ष्मी रो हाऊससमोर लग्नाचा मांडव टाकण्यात आलेला होता. परंतु यामुळे रात्रीच्या सुमारास रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबतची तक्रार अंबड पोलिसांना मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी या परिसरात रात्र गस्तीवर असलेले अंमलदार नितीनकुमार पाटील यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. अंमलदार हे रात्री दहाच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. यावेळी अंमलदार नितीनकुमार यांनी आयोजक दादाजी भामरे यांना मांडव काढण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, भामरे यांनी नगरसेविका सुवर्णा मटाले यांना फोन केला. मटाले यांनी पोलिस अमलदारांना कारवाई करण्यापासून रोखले. संशयित भामरे यांना चिथावणी देत अंमलदार करत असलेल्या कारवाईला विरोध केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा व संशयिताला चिथावणी दिल्याचा ठपका ठेवत मटाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्तव्यावरील अंमलदाराला कारवाई करताना अटकाव करीत संशयिताला चिथावणी दिल्याप्रकरणी नगरसेविका मटाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आयोजक भामरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यासंदर्भात तासाभरात तो मांडव काढून घेऊ अशी विनंती करुनही पोलिसांनीच वाद घातला व त्यानंतर माझ्यावर कारवाई केली गेल्याचे सुवर्णा मटाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी केवळ दूरध्वनीवरुन पोलिसांशी संपर्क साधून विनंती केली. प्रत्यक्ष समारंभाला उपस्थितीत नव्हते असे मटाले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोणत्याही सार्वजनिक उत्सवासाठी किंवा लग्नासाठी रस्ता अडवून सर्वसामान्यांची गैरसोय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT