Fake Baba Promises Rs 15 Crore Money Rain Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष; गोणी उघडताच भोंदूचा भांडाफोड ! पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Money Rain Scam Nashik : 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नाशिक जिल्ह्यातील एका भोंदूने आपल्या साथीदारांच्या मदतीने मुंबईतील काही कुटुंबांची आर्थिक फसवणूक केली.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीच्या घटना सातत्याने पुढे येताना दिसत आहे. भोंदूबाबांचा जणू सुळसुळाट आहे. अंनिसने पोलिसांच्या मदतीने आता आणखी एका भोंदूचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे खुर्द गावातील एका भोंदूने मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी कर्मचाऱ्यासह त्यांच्या ओळखीतील काही जणांची 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली. मंत्र तंत्र, पूजा विधी करण्याचा बहाणा करून पंधरा कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. त्यामुळे या भोंदू विरोधात अभोणा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री भोंदूसहित त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी भोंदू व इतर दोघांना याप्रकरणी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून २०१९ मध्ये सेवानिवृत्त झालेले राजाराम सिताराम शेलार यांना त्यांच्या काही मित्रांनी भोंदू हिराचंद शिवाजी बर्डे बाबा याची ओळख करून दिली. तो मंत्र तंत्र पूजा विधी करून पैशांचा पाऊस पाडतो असे सांगितले. त्यासाठी या भोंदूला अगोदर काही रक्कम द्यावी लागेल आणि त्यानंतर तो मंत्र तंत्र व पूजा विधी करून पैशांचा पाऊस पाडतो असेही सांगितले. त्यानुसार राजाराम शेलार व त्यांच्या इतर चार पीडित मित्रांनी सुरुवातीला प्रत्येकी एक हजार रुपये भोंदूला दिले. भोंंदूबाबने या पैशांचे मी दोन लाख रुपये करुन दाखवतो असे सांगितले.

या भोंदूने मंत्र तंत्र व पूजा विधी करण्याच्या बाहण्याने इतरांना वेगळ्या खोलित बसवून स्वत: वेगळ्या खोलीत गेला व दार बंद करुन घेतलं. १५ ते २० मिनिटांनी दार उघडून आपण दोन लाख रुपयांचा पाऊस पडल्याचे दाखविले. पैशाचा पाऊस पडण्याचा हा चमत्कार पाहून सगळ्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यानंतर बाबाने असे सांगितले की, जर पाच जणांनी मिळून मला अकरा लाख रुपये दिले तर मंत्र तंत्र, पूजा विधी करून त्यांना पंधरा कोटी रुपयांचा पाऊस पाडून देईल. असे आमिष दाखवून भोंदूने संबंधितांकडून वेळोवेळी रोख व ऑनलाइन पद्धतीने १० लाख ९५ हजार रुपये उकळले.

पूजा विधी करताना त्यांच्या हातात तांदूळ, अगरबत्ती आणि नारळ दिले व मंत्र सुरू केले. त्यानंतर नारळातून अचानक स्फोट होऊन चमत्कार घडल्याचे भासविले. आणि त्यानंतर त्याने तीन कोटी रुपयांच्या पैशांचा पाऊस पडल्याचे सांगितले आणि गोणी भर पैसे त्यांच्या हवाली केले. नोटांनी भरलेली ही गोणी घरी घेऊन जा आणि सात दिवस तिची पूजा करा. त्या अगोदर गोणी उघडू नका. नाहीतर तुमच्यावर कोप होईल, अशी भीती त्यांना दाखवली.

गोणी उघडताच भांडाफोड....

दरम्यान पीडितांच्या काकूचे निधन झाल्यामुळे पीडितांनी त्या गोणीची पूजा केली नाही. त्यामुळे या गोणीतील रक्कम आता अशुद्ध झाली ती शुद्धीकरणासाठी पुन्हा पूजा करावी लागेल आणि त्यासाठी पुन्हा रक्कम द्यावी लागेल असे भोंदूने सांगितले. त्यामुळे पीडितांनी पुन्हा भोंदूला काही लाख रुपये दिले. मात्र पीडितांना काही दिवसांनी याबद्दल शंका निर्माण झाल्याने त्यांनी गोणी उघडून पाहिली. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, गोणी मधील नोटांच्या बंडलमध्ये फक्त वरची नोट खरी होती आणि इतर नोटा ह्या लहान मुलांच्या खेळण्यांमधील खोट्या नोटा होत्या.

कपडे काढून पूजा.....

याबाबत त्यांनी भोंदूबाबाला जाब विचारला. तेव्हा भोंदूने पीडिताना असे सांगितले की तुम्हाला कपडे काढून अमावशेच्या रात्री स्मशानात पूजा करावी लागेल. मात्र अशी पूजा करण्यास या पीडितांनी नकार दिला व त्यांनी दिलेले रक्कम परत मागितली. मात्र भोंदूने त्यांना गायब करण्याची तसेच मारून टाकण्याची धमकी दिली.

गुन्हा दाखल करुन अटक

यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांशी संपर्क केला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने अभोणा पोलीस स्टेशन गाठले. त्यानतंर प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी भोंदू हिराचंद बर्डे यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सदर भोंदूने अशाच प्रकारे कुणाला फसविले असेल तर त्यांनी अभोणा पोलिसांशी किवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT