Nashik Crime Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून अघोरी पूजा ; सात लाख रुपये उकळले, नाशिकमध्ये आणखी एक खरात

Nashik Fake Godman, Arun Dhondu Patil : आजाराने त्रस्त झालेल्या महिलेचा आजार बरा करुन देण्याचे आमिष दाखवले. अघोरी पूजा करुन त्या बदल्यात साडे सात लाख रुपये उकळले. नाशिकमधील धक्कादायक घटना.

Ganesh Sonawane

Nashik News : आजाराने त्रस्त झालेल्या महिलेचा पूजाविधीने आजार बरा करण्याचे व दैवी शक्तीच्या जोरावर पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यात एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण धोंडू पाटील असे संशयित भोंदूबाबाचे नाव असून, या भोंदूने पीडितेला अर्ध नग्न अवस्थेत बसवून पूजा केली व साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पाठपुराव्यामुळे या भोंदूचा पर्दाफाश झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पनवेल येथील एक महिला अस्थमाच्या आजाराने त्रस्त होती. महिलेला नाशिकच्या गंगापूर शिवारातील अरुण धोंडू पाटील या भोंदूबाबाविषयी माहिती मिळाली. भोंदूने पीडितेच्या घरी गाडी पाठवून तिला व तिच्या पतीला पनवेलवरून डोळ्यावर काळी पट्टी बांधून नाशिकला आणले. अघोरी पूजा झाल्यावर पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून पनवेलला सोडले. पुन्हा दुसऱ्या वेळेही असेच केले. त्यांना आजारपणावर काहीसा गुण आल्याचा भास निर्माण केल्याने त्यांचा भोंदूवर विश्वास बसला.

त्याचाच गैरफायदा घेत भोंदूने पैशाचा पाऊस पाडून देतो ,असे आमिष दाखवले. त्यासाठी पीडितेच्या मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणायला सांगितले. पनवेल वरून त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून नाशिकच्या गंगापूर रोड येथे आणले. महिलेची अघोरी पूजा करण्यात आली . तिच्या अंगावरचे कपडे काढून सफेद पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आले. त्यावर पाणी टाकण्यात आले.

मासिक पाळीचे रक्ताने माखलेले कपड्याची पूजा केली. मानवी कवटी , तांदूळ , हळद, कुंकू गुलालाचे पाणी, बुक्का आदी वापरून अघोरी पूजा करण्यात आली. पीडितेने दिलेल्या पैशांची पूजा करण्यात आली. भोंदूने मंत्रोच्चार करत साधारण दोन तास ही अघोरी पूजा केली. त्यासाठी बोकडाचा बळी देण्यात आला. घरी गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल असे सांगितले. पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना पनवेलला सोडण्यात आले. या सर्व तीन्ही पूजाविधींचे भोंदूने त्यांच्या कडून एकूण साडेसात लाख रुपये उकळले.

मात्र, इतकं करुनही पैशांचा पाऊस पडला नाही व आजारपणही दूर झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने भोंदू बाबाकडे पैसे परत मागितले. मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली.

त्या नंतर गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सदर भोंदू अरुण धोंडू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याकामी महा. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्तरी, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, कोमल वर्दे, डॉ. मंगेश कादे आदींनी परिश्रम घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT