

Nashik PSI Accident : नाशिकमधील सप्तशृंगगड परिसरात भीषण अपघात झाला असून, नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला, तर ११ हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे नाशिक पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव सुरु असून सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक गडावर येत आहेत. वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे देखील पोलिस बंदोबस्त तैनात आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास नांदुरीजवळील अभोणा चौफुली येथे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर होते. याठिकाणी वाहतूक नियोजनासाठी अडथळेही उभारण्यात आले होते. यावेळी वणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने थेट अभोणा चौफुली येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धडक दिली.
या अपघातात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या हनुवटीला व पाठीच्या कण्याला गंभीर फ्रॅक्चर झाले आणि रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. पोलीस हवालदार सचिन राऊत यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. मोरेश्वर बाळू पाटील (वय ५२, रा. महापे, मुंबई) यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या पत्नी तेजस्वी व राम गोपाळ एकनाथ सोनवणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सर्व जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू असून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी दोन्ही रुग्णालयांना भेट दिली. धडक देऊन फरार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली आहेत. पोलीस कल्याण निधीतून तातडीने आर्थिक मदत देण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्यावर नाशिक शहरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कर्तव्य बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेत आपल्या सहकाऱ्याला गमावल्याबद्दल जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासन तीव्र शोक व्यक्त करीत आहे. गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी व भाविकांनी विशेष दक्षता बाळगावी, वाहतूक नियमांचे पालन करावे व पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.