Nashik News : नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गा प्रकरणी आता नवीन ट्विस्ट समोर आला आहे. नाशिक महानगरपालिका व पोलिसांनी हा दर्गा हटवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली असून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी केली गेली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
त्यावर, दर्गा ट्रस्ट किंवा मुस्लिम समाजातील व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची कोणतीही माहिती आपल्याला दिली नव्हती, त्यामुळे आपल्याला त्याबद्दल काही माहितीच नव्हती असे स्पष्टीकरण नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहे.
पोलिस आयुक्त म्हणाले, दर्ग्यासंबधी सुप्रिम कोर्टातील याचिकेची आपल्याला माहितीच नव्हती, दर्गा ट्रस्टसोबत झालेल्या बैठकीतही याचिकेचा उल्लेख नव्हता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त कर्णिक यांनी दिलं आहे.
पोलिस आयुक्त म्हणाले, काल या घटनेसंदर्भात गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही स्फॉटवरच १५ आरोपी ताब्यात घेतले होते. जे तिकडे दंगा करत होते. त्यानंतर आमचे जे अधिकारी अमंलदार त्याठिकाणी होते, त्यांनी त्यातील बरचशे लोक ओळखलेले होते. त्यांची नावं एफआयआरमध्ये आलेली आहे.
त्याचबरोबर त्याठिकाणी अनेक लोक दुचाकीवर आले होते. पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर ते सगळे पळून गेले पण त्यांच्या दुचाकी त्याठिकाणी राहिल्या. त्या सगळ्या दुचाकी आपण ताब्यात घेतल्या आहेत, त्या कुणाच्या दुचाकी आहेत, त्यावर कोण लोक आले होते याचा तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
साधरण १४०० ते १५०० जणांचा जमाव जमला होता. त्यातील ५० ते ५५ लोकांची ओळख पटली आहे. आरोपींच्या नावात त्यांचा समावेश केला आहे. काल आणखी १५ जणांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्याकडून आणखी काही नावे मिळाली आहेत अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिक पोलिसांना इनपुट्स मिळत होते. काही लोक मीटिंग घेऊन लोकांची माथी भडकवण्याचे काम करत होते. त्याचा अंदाज घेऊन आम्ही आधीच पोलिस बंदोबस्ताची तयारी केली होती असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.
याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे. तर यात 21 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत. या प्रकरणी 14 संशयित आरोपीना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर 11 जणांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.