Ayush Prasad | Nashik Collector Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून 207 भूमिहीन कुटुंबांना दिवाळी गिफ्ट! चार तालुक्यांत घरासाठी मिळणार मोफत सरकारी जमीन

207 Landless Families in Nashik to Get Free Government Land : नाशिक जिल्ह्यातील २०७ भूमिहीन कुटुंबांना हक्काच्या घरासाठी मोफत शासकीय जमीन मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला.

Ganesh Sonawane

Nashik Collector Ayush Prasad Approves Land Allotment : अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या जागेअभावी घरकुलापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबांसाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशिक जिल्हा प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, सिन्नर आणि येवला या चार तालुक्यांतील २०७ पात्र भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जमिनी विनामूल्य मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या मालकीच्या जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वतःची जागा नसल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना झोपड्यांमध्ये, अतिक्रमित जागांवर किंवा इतरांच्या जमिनीवर निवारा शोधावा लागत होता. घरकुल योजनेचा लाभ मंजूर होऊनही जागेअभावी घर बांधता येत नसल्याने या कुटुंबांची अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या समन्वयातून विशेष प्रयत्न केले. आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून एकाच आदेशाद्वारे २०७ कुटुंबांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९४ कुटुंबांना लाभ

बागलाण तालुक्यातील सहा गावांमधील एकूण ९४ कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये मौजे सरवर (गट क्र. १) येथील ५, मौजे आंबासन (गट क्र. १४) येथील १३, मौजे राजपुरपांडे (गट क्र. १२२) येथील १३, मौजे साकोडे (गट क्र. ११४/९) येथील ४२, मौजे मळगाव/तिळवण (गट क्र. १३) येथील २ आणि मौजे वाडीपिसोळ (गट क्र. ५९) येथील १९ कुटुंबांचा समावेश आहे.

मालेगाव तालुक्यातील ७८ कुटुंबांना हक्काची जागा

मालेगाव तालुक्यातील चार गावांमधील ७८ कुटुंबांसाठी जमिनी मंजूर करण्यात आल्या आहेत. मौजे देवघट (गट क्र. १५७ व १८६) येथील ११, मौजे तिळवण (गट क्र. ८५) येथील ७, मौजे वऱ्हाणे (गट क्र. ३०८) येथील ४ आणि मौजे झोडगे (गट क्र. ४७२ व ८८३/२/अ) येथील ५६ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

सिन्नर व येवला तालुक्यांचाही समावेश

सिन्नर तालुक्यातील मौजे बोरखिंड येथील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत १० कुटुंबांना (गट क्र. १३४), तर येवला तालुक्यातील मौजे मुखेड येथील २५ कुटुंबांना (गट क्र. १११३/३) घरकुलासाठी शासकीय जमीन मंजूर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींकडे जमिनी वर्ग; पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार वितरण

मंजूर करण्यात आलेल्या जमिनींचे भूखंड संबंधित ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आले आहेत. नियमानुसार निवासी अभिन्यास मंजूर करून पात्र लाभार्थ्यांना भाडेपट्ट्याने अथवा प्रचलित धोरणानुसार जमिनीचे वितरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या नावावर यापूर्वी कोणतेही घर किंवा भूखंड नसल्याची खातरजमा करूनच प्रत्यक्ष ताबा देण्याचे निर्देश संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील भूमिहीन व गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केवळ घरकुल मंजूर करून न थांबता घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयामुळे २०७ कुटुंबांच्या आयुष्यात सुरक्षित निवाऱ्याची नवी आशा निर्माण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय संबंधित कुटुंबांसाठी आनंदाची आणि समाधानाची पर्वणी ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT