Mahajan Vs Bhuse News: नाशिकचे पालकमंत्री कोण? हा विषय गेल्या काही दिवसात पडद्याआड गेला होता. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यात घडलेल्या घडामोडींनी भाजपने तशी स्थिती निर्माण केली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची जानेवारी महिन्यात नियुक्ती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड साठी अदिती तटकरे आणि नाशिक साठी गिरीश महाजन यांची घोषणा केली. त्याला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या.
गेले सहा महिने नाशिकला पालकमंत्री नसल्याने त्याबाबत सातत्याने चर्चा होत राहिली. थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत हस्तक्षेप करीत पालकमंत्र्याशिवाय काही अडले आहे का? असे विधान करावे लागले होते. या कालावधीत गिरीश महाजन यांनी देहबोली आणि अधिकाऱ्यांच्या बैठका यातून आपणच पालकमंत्री असा संदेश दिला.
पालकमंत्री पदासाठी जेष्ठ मंत्री छगन भुजबळ सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र सध्या ते याबाबत तोलून मापून आणि अतिशय सावधपणे प्रतिक्रिया देतात. त्यांनी महायुती सरकारमधील कोणालाही दुखवायचे नाही अशी मध्यम भूमिका घेतलेली दिसते.
पालकमंत्री पदासाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे दोघेही इच्छुक होते. त्यांच्या पक्षाकडूनही प्रारंभी त्यांना चांगला पाठिंबा होता. त्यामुळे विशेषता भुसे समर्थक याबाबत पालकमंत्री आपलाच असे गृहीत धरूनच काम करीत होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेत श्री भुसे यांनी विविध बैठका देखील घेतल्या.
मात्र राजकीय वातावरण बदलले. त्यात सर्वात आधी कृषी मंत्री कोकाटे यांची विकेट पडली. श्री कोकाटे यांनी केलेल्या विधानांमुळे ते राज्यभर नकारात्मक चर्चेचे धनी ठरले. एका मागोमाग वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसे झाले. अखेर जंगली रमीने त्यांचा बळी घेतलाच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे खाते बदलावे लागले. यातून पालकमंत्री पदाच्या स्पर्धेतूनही कोकाटे बाहेर पडले आहेत.
आता दादा भुसे यांना अडचणीत आणण्यासाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्षच फासे टाकत आहे, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांना अतिशय प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यात तेराशे कोटींचे मल्लनिसारण प्रकल्पाच्या निविदा आणि शहरातील रस्त्यांचे काम यात महायुतीच्या तिन्ही पक्षांना 'रस' आहे.
वसईच्या माजी आयुक्तांवर नगर विकास प्रकरणी मोठा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत ईडीने त्यांच्या वसई नाशिक तसेच अन्य बारा ठिकाणी छापे घातले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मालमत्ता आढळली आहे. हे प्रकरण आगामी काळात अधिक गाजण्याची चिन्हे आहेत. याचा फटका एखाद्या मंत्र्याला बसेल का ही चर्चा रंगली आहे.
या सर्व घडामोडी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहे. यामध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मार्ग त्यांच्यासाठी सुकर झाला, असे त्यांच्या समर्थकांत बोलले जाते. याबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यावर पूर्वी केला तसा विरोध शिवसेना एकनाथ शिंदे घेईल अशी आजची स्थिती नाही.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.