Nashik Simhastha Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी 84 धार्मिक संस्थांची पडताळणी पूर्ण; 31 संस्थांनी मागितले साडेपाच कोटी, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष!

Nashik Kumbh Mela 2027 : कुंभमेळा प्राधिकरणाकडे नोंदणी केलेल्या ८४ संस्थांपैकी ३१ संस्थांनी विविध सोयीसुविधांच्या उभारणीसाठी एकूण ५ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यामुळे आता शासनाच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.

Ganesh Sonawane

Verification of 84 Religious Institutions Completed for Nashik Kumbh Mela 2027 : आगामी २०२७ च्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी धार्मिक संस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्यांची प्रशासकीय तपासणी पूर्ण झाली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाकडे नोंदणी केलेल्या ८४ संस्थांच्या अर्जांची आणि त्यांनी मागितलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यातील ३१ संस्थांनी विविध सोयीसुविधांच्या उभारणीसाठी एकूण ५ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, या निधीला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाकडून होणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा धार्मिक संस्थांना आहे.

कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने डिजिटल माध्यमातून 'एकल खिडकी' प्रणाली सुरू केली होती. या प्रणालीच्या माध्यमातून धार्मिक संस्थांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. राज्यातील विविध भागांसह देशभरातील संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. प्राप्त अर्जांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत छाननी करण्यात आली असून, संबंधित संस्थांच्या जागांवर जाऊन सुविधांच्या आवश्यकतेची प्रत्यक्ष तपासणीही पूर्ण झाली आहे.

शासनाच्या धोरणानुसार पात्र धार्मिक संस्थांना जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. मात्र, नोंदणी केलेल्या प्रत्येक संस्थेला सरसकट अनुदान दिले जाणार नाही. संस्थेची पात्रता, कुंभमेळ्यादरम्यान अपेक्षित भाविकांची संख्या, मागणी केलेल्या सुविधांची गरज आणि कुंभपर्वातील संस्थेचे ऐतिहासिक योगदान या बाबींचा विचार करून निधीचे वितरण केले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करता यावीत, यासाठी निधीला लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी संस्थांच्या प्रतिनिधींकडून केली जात आहे.

८४ संस्थांमध्ये ४५ संस्थानांचा समावेश

प्राधिकरणाकडे नोंदणी झालेल्या धार्मिक संस्थांचे स्वरूपही विविध आहे. यामध्ये ४५ संस्थाने, १३ आश्रम, १२ आखाडे, ६ मंदिरे, ५ मठ आणि अन्य ३ धार्मिक स्थळे व साधू निवासांचा समावेश आहे. याशिवाय प्राधिकरणाच्या अधिकृत नोंदवहीमध्ये पारंपरिक १३ आखाड्यांची नोंद अद्ययावत करण्यात आली आहे.

नाशिकबाहेरील संस्थांनीही केली नोंदणी

नोंदणी केलेल्या ८४ संस्थांपैकी ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. यामध्ये नाशिक तालुक्यातील ३५, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २० संस्थांचा समावेश आहे. उर्वरित १३ संस्था नाशिक जिल्ह्याबाहेरील तसेच राज्याबाहेरील आहेत. या संस्थांमध्ये शिर्डी साईबाबा संस्थान, प्रयागराज येथील पीठ, तसेच अहमदाबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथील आखाड्यांचा समावेश आहे.

धार्मिक उपक्रमांसाठी पायाभूत सुविधांचे नियोजन

कुंभमेळ्याच्या काळात आखाड्यांचे अमृतस्नान, विविध धार्मिक विधी, साधू-संतांच्या निवासाची व्यवस्था, अन्नदान, भजन-कीर्तन यांसह भाविकांसाठी अनेक सेवा उपक्रम आयोजित केले जातात. या सर्व उपक्रमांसाठी जागा, पाणी, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता असते. त्यामुळे धार्मिक संस्थांच्या नोंदणीसोबतच त्यांच्या गरजांची माहिती संकलित करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

आता ८४ संस्थांच्या अर्जांची आणि जागांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात निधी मंजुरी आणि मागणी केलेल्या सुविधांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होणार, याकडे संबंधित संस्थांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT