Ancient Shiva Ling, Nandi and temple remains discovered during Ramkal Path work in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : रामकाल पथचे काम सुरु असताना आढळले प्राचीन शिवलिंग, नंदी अन् मंदिराचे अवशेष ; पुरातत्त्व विभागाचे काम थांबवण्याचे आदेश

Ancient Shiva Ling, Nandi and Temple Remains Found During Ramkal Path Work : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रामकाल पथच्या कामादरम्यान प्राचीन शिवलिंग, नंदी आणि मंदिराचे अवशेष आढळले आहेत.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदाघाट आणि पंचवटी परिसरात रामकाल पथ प्रकल्पाचे काम सुरु आहे. या विकासकामांसाठी खोदकाम सुरु असताना दुतोंड्या मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला प्राचीन शिवलिंग, नंदी आणि मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत.

दुतोंड्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्यांसाठी खोदकाम सुरू असताना हे अवशेष समोर आले. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाने हस्तक्षेप करत संबंधित ठिकाणचे काम तातडीने थांबविण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. या अवशेषांचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने बुधवारी (दि. २५) नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या शहर अभियंत्यांना पत्र पाठवून खोदकाम थांबवण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात देवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वेदांत जानोराव यांनी २३ नोव्हेंबरला केलेल्या तक्रारीनंतर विभागाने ही भूमिका घेतली. त्यांच्या निवेदनानुसार, १९९७ मधील स्थिती सर्वेक्षणाच्या ऐतिहासिक नकाशात या परिसरात पाच प्राचीन मंदिरांची नोंद आहे.

या परिसरात प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळल्याने पुरातत्त्व विभागाचे पथक प्रत्यक्ष पाहणी करेपर्यंत संबंधित परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम करू नये, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आढळलेले अवशेष सुरक्षित ठेवून त्यांच्या जतन व संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

खोदकामात आढळलेल्या पुरातन वास्तूंच्या अवशेषामुळे पंचवटीच्या ऐतिहासिक वारशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर अवशेषांचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होणार असून, त्यांच्या संवर्धनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. विकासकामांदरम्यान गोदाघाट व पंचवटी परिसरात आणखी काही पुरातन अवशेष आढळल्यास त्याची तत्काळ माहिती पुरातत्व विभागाला द्यावी असे निर्देश पालिकेला देण्यात आले आहेत.

नाशिकची ओळख येथील प्राचीन मंदिरे, कुंडे, घाट आणि ऐतिहासिक वारशामुळे आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर विकासाची कामे होत असताना, आपल्या या अमूल्य प्राचीन वारशाला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व्हावे, अशी अपेक्षा नाशिककर गोदाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT