Rahul Gandhi Nashik Visit Kumbh Mela: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे.
कुंभमेळ्याच्या कामांमधील भ्रष्टाचाराबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी खासदार राहुल गांधी यांच्याकडे कैफियत मांडली. या मुद्द्यावर केंद्रात आवाज उठविणार असल्याचे गांधी यांनी यावेळी प्रदेश नेत्यांना सांगितले.
खासदार राहुल गांधी २ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटन सृजन या दहादिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. नाशिकमध्ये दाखल होताच त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत नाशिक शहरातील तसेच राज्यातील विविध महत्वाच्या मुद्द्यांव राहुल गांधींनी चर्चा केली.
प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, तसचे आगामी कुंभमेळ्याच्या कामांसह शेतकरी प्रश्नांवर त्यांनी नेत्यांकडून माहिती घेतली. नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांबाबत मोठ्या तक्रारी असल्याचे यावेळी नेत्यांनी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिले.
या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत तशी तक्रार कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली. याबाबत सविस्तर माहिती घेऊन अहवाल द्यावा, अशा सूचना राहुल गांधी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. सिंहस्थ कामांतील भ्रष्टाचारावर संसदेत आवाज उठवणार असल्याचं राहुल गांधींनी यावेळी प्रदेश नेत्यांना सांगितलं.
याशिवाय, ‘SIR’बाबतही राहुल गांधी यांनी नेत्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधत विचारणा केली. त्यासंदर्भात बूथ लेव्हलवरील कामांची माहिती त्यांनी घेतली. पक्ष संघटनेत काम करताना काय अडचणी आहेत का? अशी विचारणा त्यांनी करीत एकजुटीने काम करण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच पक्ष संघटनेत काय करायला हवे, याबाबतही राहुल गांधी यांनी नेत्यांकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.
या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळातील पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, प्रणिती शिंदे, डॉ. शोभा बच्छाव, माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.