Nashik Simhastha Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : राष्ट्रपती येणार, पण गोदावरी कोरडी : रामकुंड कसे खळाळणार? प्रशासनाने शोधला अनोखा उपाय!

Nashik Godavari River : यंदा कुंभमेळ्याच्या आधीच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पुरोहित संघाचा ध्वजारोहण सोहळा शनिवारी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने नाशिक औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाण्याचे रोटेशन सोडून गोदावरी नदी आणि रामकुंड प्रवाही केले आहे.

Sampat Devgire

Nashik News, 30 Oct : राज्यभरात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. गोदावरी नदीचे पात्र आणि रामकुंड सध्या कोरडे पडले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या कुंभमेळ्याची विविध कामे गोदावरी आणि रामकुंड परिसरात सुरू आहेत. दुसरीकडे, पावसाने पाठ फिरवल्याने नदीपात्र कोरडे आहे. अशा परिस्थितीत शनिवारी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम अडचणीत सापडला होता.

यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात २०१५ च्या कुंभमेळ्यातील पाणीटंचाईची समस्या पुन्हा उद्भवली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकलाही पाणीटंचाईची झळ बसली आहे. त्यामुळे सध्या गोदावरीचे पात्र आणि रामकुंड कोरडे पडले आहे. गेल्या कुंभमेळ्यातही अशीच समस्या उद्भवली होती. त्यामुळे शाही स्नानासाठी पाणी सोडण्याबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती. काही जलतज्ज्ञांनी पाणी सोडू नये, यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावेळी प्रशासनाने संपूर्ण कुंभमेळ्यासाठी ७०० एमसीएफटी पाणी सोडले होते. गंगापूर धरणातून हे पाणी निफाड तसेच जायकवाडीसाठीच्या रोटेशनचा भाग म्हणून सोडण्यात आले होते. तसे प्रतिज्ञापत्र पाटबंधारे विभागाने उच्च न्यायालयात दिले होते. त्यामुळे कुंभमेळ्यातील शाही स्नान उत्साहात पार पडले आणि नियमांचे उल्लंघनही झाले नव्हते.

यंदा कुंभमेळ्याच्या आधीच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. पुरोहित संघाचा ध्वजारोहण सोहळा शनिवारी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे. ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गोदावरी आरतीही होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने नाशिक औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाण्याचे रोटेशन सोडून गोदावरी नदी आणि रामकुंड प्रवाही केले आहे. त्यामुळे कोरड्या रामकुंडासाठी पर्याय आणि उपाय शोधण्यात आला.

गंगापूर धरणातून आज सकाळी पाण्याचे रोटेशन सोडण्यात आले आहे. नाशिक औष्णिक विद्युत केंद्रासाठी हे रोटेशन सोडण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे गोदावरी नदी आज दिवसभर खळाळती राहणार आहे. कोरडे पडलेले रामकुंड प्रवाही करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य आणि आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास यांनी या उपक्रमाचे समर्थन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT