

Pune News, 30 Oct : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. नऊ परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांना १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदने व पुरावे सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
‘सकाळ’ने चौकशी आयोगाच्या रखडलेल्या कामकाजाबाबत वृत्त प्रसिद्ध करून हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आयोगाने जाहीर सूचना प्रसिद्ध केल्याने चौकशीच्या दिशेने पुढील पाऊल पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगाला ६० दिवसांत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
मात्र, १५ दिवस उलटूनही आयोगाची एकही बैठक झाली नसल्याचा मुद्दा विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. चौकशीचा आराखडा आणि कार्यपद्धती स्पष्ट नसल्याने निर्धारित मुदतीत चौकशी पूर्ण होणार का, अशी शंकाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. याबाबत ‘सकाळ’ने २६ ऑक्टोबर रोजी ‘चौकशी आयोगाची एकही बैठक नाही’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेत आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) अन्न व औषध प्रशासन भवनामध्ये आयोगाचे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून, कामकाजाला सुरुवात झाल्याने आता सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
प्रतिज्ञापत्र कसे सादर करावे?
कथित गैरव्यवहारांबाबत माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी आणि संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात सादर करायची आहेत. त्यासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे आयोगाच्या कार्यालयात किंवा complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येतील. अधिक माहितीसाठी ०२२-२०८६७६७७ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
माहिती गोपनीय ठेवणार
आयोगाकडे सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. प्राप्त निवेदनांची छाननी करून संबंधित व्यक्तीला साक्षीदार म्हणून तपासायचे की नाही, याचा निर्णय आयोग घेणार आहे. त्यामुळे गैरव्यवहारांबाबत माहिती असलेल्या व्यक्तींनी पुराव्यांसह पुढे यावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.
या नऊ परीक्षांची चौकशी
१. औषध निरीक्षक परीक्षा, गट-ब, २०२५
२. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५
३. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५
४. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५
५. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५
६. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४
७. अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३
८. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५
९. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५
‘दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा’
"सकाळ’ने आमचा प्रश्न लावून धरल्यामुळे चौकशी आयोगाच्या कामकाजाला गती मिळाल्याचे दिसत आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी आयोगात असल्याने आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आयोगाने थेट पुरावे मागविले आहेत, ही सकारात्मक बाब आहे. गैरव्यवहारांबाबत पुरावे असलेल्या विद्यार्थ्यांनी न घाबरता ते सादर करावेत. आता १६ नोव्हेंबरनंतर लवकरात लवकर अहवाल सरकारला सादर होऊन दोषींवर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा आहे, अशी मागणी एका विद्यार्थ्याने केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.