President Droupadi Murmu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : नाशिक दौऱ्यावेळी राष्ट्रपतींना हॅलिकॉप्टरने प्रवासास मनाई, मोठं कारण आलं समोर

President Droupadi Murmu Nashik Visit : सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी राष्ट्रपती नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येणार आहेत.

Ganesh Sonawane

President Droupadi Murmu Nashik Visit : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (दि. ३१) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, या काळात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती मुर्मू नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी रस्तेमार्गाचा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिकमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३१) सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होणार आहे. यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्‍वरला जाणार असून त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार आहेत. मंदिरात सुमारे १५ मिनिटे तर व कुशावर्त तीर्थ येथे १३ मिनिटे त्यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात येणार आहे. यासर्व दौऱ्याप्रसंगी राष्ट्रपती नाशिक विमानतळापासून महाराष्ट्र पोलिस अकादमी तसेच पोलिस अकादमी ते त्र्यंबकेश्‍वर परत नाशिक असा हेलिकॉप्टरचा प्रवास करणार होत्या.

नाशिक जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठवडाभरासापासून या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. महसूल, पोलिस विभाग तसेच सुरक्षा यंत्रणांकडून दौऱ्याची आखणी सुरु आहे. त्यादृष्टीने नाशिक विमानतळ ते पंचवटीतील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्‍वर शहरात रंगीत तालीम घेण्यात आल्या. मात्र, आता राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाच्या अंदाजामुळे राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर उड्डाणावर मर्यादा आल्या आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळामुळे नाशिकसह राज्यात विविध जिल्ह्यात २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रपतींना नाशिकमध्ये दौऱ्यावेळी हेलिकॉप्टर वापरावर मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रपती आता विमानतळ ते नाशिक शहर तसेच नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर या संपूर्ण प्रवासात वाहनाने प्रवास करतील. दौऱ्यात ऐनवेळी बदल करावा लागल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव नाशिक दौऱ्यात हेलिकॉप्टरचा वापर टाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विमानतळावरून नाशिक शहरात आणि पुढे त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी रस्तेमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. ऐनवेळी प्रवासाच्या नियोजनात बदल झाल्याने सुरक्षा यंत्रणांना बंदोबस्ताची नव्याने आखणी करावी लागत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रस्तेमार्गे प्रवास करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांना सुरक्षा व्यवस्थेचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्याचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी संपूर्ण मार्गावरील बंदोबस्त, बॅरिकेडिंग, पर्यायी रस्ते आणि वाहतुकीतील बदलांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ताफा जाणाऱ्या मार्गांची पाहणी करून रस्त्यांवरील आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT