Nashik Kumbh Mela : राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी माकडांची नाकेबंदी, कशाची भीती? त्र्यंबकेश्वरमध्ये काय सुरूये

Trimbakeshwar Monkey Rescue : सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती नाशिकसह त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर असतील.
Trimbakeshwar Monkey Rescue
Trimbakeshwar Monkey Rescue Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Trimbakeshwar Monkey Rescue : त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते कुशावर्त व त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाविधी होणार असून प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची चोख खबरदारी घेतली जात असून सुरक्षा व बंदोबस्तासाठी विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्यात मर्कटलिलांचा कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये म्हणून त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून माकडांची धरपकड केली जात आहे.

माकडांची नाकेबंदी करण्यात येत असून गेल्या तीन-चार दिवसांत सुमारे ३० ते ३५ लालमुखी माकडांना पिंजऱ्यात रेस्क्यू करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वीची वनविभागाची माकडांना पिंजऱ्यात कैद करण्याची ही मोहिम सध्या चर्चेत आहे.

Trimbakeshwar Monkey Rescue
Eknath Shinde : फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शेवटचा इशारा, 'कर्जासाठी तगादा लावला, तर खडी फोडायला जाल'

कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान ब्रह्मगिरी पर्वतावरील माकडांची काही टोळकी त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झाली. त्यानंतर त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. सध्या शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि रहिवासी भागात माकडांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या दीड वर्षात त्र्यंबकेश्वर परिसरात ५१२ लोकांना माकडांनी चावा घेतल्याची नोंद त्र्यंबकेश्वर जिल्हा रुग्णालयाच्या दप्तरी आहे.

त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या भाविकांना देखील या माकडांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माकडांकडून भाविकांना चावा घेण्यासोबतच पूजासाहित्य व फळे पळवणे, पूजेचे साहित्य विस्कळीत करणे, पाण्याचे तांबे उलथवून नुकसान करणे असे प्रकार वाढले आहेत. म्हणून ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या माकडांना तात्पुरते पकडले जात असून सोहळा आटोपल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती आहे. तोपर्यंत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी वनविभाग पाहणार आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींचा दौरा संपल्यानंतरही या उपाययोजना कायम राहाव्या अशी मागणी त्र्यंबकवासियांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये माकडांच्या किंवा जनावरांसाठी हक्काच्या निवारा केंद्राची जागा निश्चित करावी व केंद्र सुरु करावे अशीही मागणी होत आहे.

Trimbakeshwar Monkey Rescue
Nashik Kumbh Mela : सिंहस्थाच्या आखाड्यात एकनाथ शिंदेंची एण्ट्री; १३ आखाड्यांतील साधू-महंतांच्या भोजनाची जबाबदारी घेतली

माकडांना खाऊ घालणे हा गुन्हा

त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांनी वन्यप्राणी माकडांना कुठल्याही प्रकारचे मानवी खाद्यपदार्थ किंवा फळे खाण्यासाठी देऊ नये. भूतदया दाखवू नये. यामुळे त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल होतो आणि त्याचा स्वभाव आक्रमक बनतो. भारतीय वन्यजीव कायद्यांतर्गत वन्यप्राण्यांना खायला देणे गुन्हा ठरतो असे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com