Nashik Kumbh Mela : मंत्रालयातील अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) खारघर परिसरात रंगेहात पकडले. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी लाडने लाचेची मागणी केली होती. या लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेल्या विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड हा नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसत आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठीच्या १ हजार २४ प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहे आणि त्यात आपला कोटा ठरला असून कोट्यवधी रुपयांचे कमिशन मिळणार आहे, सर्वांचे कमिशन फिक्स करण्यात आल्याचा दावा विलास लाडने कथित ऑडिओ क्लिप मध्ये केला आहे. दरम्यान सरकारनामा या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्ठी करत नाही.
लाच प्रकरणात एसीबीच्या अटकेत असलेल्या विलास लाडची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये कथित विलास लाड समोरच्या व्यक्तीला नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यातील टेंडर आणि त्यातील कमिशनबाबत माहिती देताना दिसतोय. तसेच त्यातून आपल्याला कोट्यवधींचे कमिशन मिळणार असल्याचा दावा देखील करताना दिसतोय. मात्र विलास लाड सध्या अटकेत असून त्याने या फोन संभाषणात केलेले दावे नक्की खरे की खोटे याबाबत स्पष्टता नाही.
या ऑडिओ क्लीपमधील संभाषणात विलास लाड समोरच्याला सांगतोय की, आपल्याला खूप मोठं काम मिळालं आहे. नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे बजेट आहे. त्यातील काही निधी केंद्राने दिलाय तर काही राज्याने. अकाउंटला निधी येऊन पडलाय. या कामांचे टेंडर मॅनेज करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून ते क्लर्क पर्यंत प्रत्येकाचे कमिशन ठरले आहे. त्यामध्ये माझ्या वाट्याला ५०० कोटींच्या कामाचा कोटा आल्याचा दावा विलास लाडने केला आहे. आपण स्वतः ७०० तंबू उभारण्याचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडरही घेतल्याचा दावा कथित क्लीपमध्ये विलास लाड करताना दिसतोय.
या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर १८ कोटी रुपयांचे असून ते देखील आपल्याला मिळाल्याचा दावा विलास लाडने केल्याचे दिसत आहे. कुंभमेळा फक्त ४० दिवसांचा आहे, त्यामुळे एवढा खर्च येत नाही, यातून मोठं कमिशन मिळणार असल्याचा दावा विलास लाडने कथित क्लीपमध्ये बोलताना केला आहे. तसेच तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही मॅनेज करुन टेंडर देऊयात असं विलास लाड समोरच्याला सांगतोय. फक्त कुणाला म्हणू नको असही सांगतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.