अशासकीय प्रशासक मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी
१. गणेश बबन गीते – अध्यक्ष
२. बाळासाहेब महादु सानप- सदस्य
३. सचिन भास्कर ढिकले- सदस्य
४. बापू विश्वनाथ पिंगळे- सदस्य
Nashik APMC Politics : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार बाजार समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे गणेश गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाजार समिती अप्रत्यक्षपणे भाजपच्या ताब्यात गेली आहे.
प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे २१ जुलै २०२६ रोजी विभाजन करण्यात आले. या विभाजनातून नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तीन स्वतंत्र्य बाजार समित्या अस्तित्वात आल्या. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तीनही बाजार समित्यांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी स्वतंत्र्य प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, आता सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रशासक ऐवजी बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पणन संचालनालयाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.
त्यानुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे गणेश गिते यांची तर, भाजपचे बाळासाहेब सानप, बापू पिंगळे व शिवसेनेचे(शिंदे गट) सचिन ढिकले या तिघांची सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. आता पुढील ६ महिने किंवा आगामी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाजार समितीचा कारभार अशासकीय प्रशासकीय मंडळाचे सदस्य बघणार आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १५(अ) मधील तरतुदींनुसार यापूर्वीच्या प्रशासकाऐवजी अशासकीय प्रशासक मंडळाला मान्यता देण्यात आली आहे.
चुंभळेंचा होता विरोध
नाशिक बाजार समितीच्या विद्यमान (सध्या बरखास्त झालेल्या) संचालक मंडळाकडून बाजार समितीचे विभाजन रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. बाजार समितीच्या विभाजनाचा निर्णय हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून, पणन संचालकांवर दबाव आणून तो घेण्यात आल्याचा आरोप माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला होता. विभाजनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्यात आता बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.