

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत फेब्रुवारी महिन्यात महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेता पदाची निवड होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेला अजून विरोधी पक्षनेता मिळालेला नाही.
नाशिक महापालिकेत एकुण १२२ नगसेवक आहेत. त्यात सर्वाधिक ७२ नगरसेवक भाजपकडे असल्याने पालिकेवर भाजपची सत्ता आहे. तर २६ नगरसेवक असलेला शिवसेना (शिंदे गट) देखील भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे त्या खालोखाल १५ नगरसेवक असलेला शिवसेना (उबाठा) पक्ष विरोधी गटातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार विरोधी पक्षनेतेपद 'उबाठा'कडे जाणार हे स्पष्ट आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रथमेश गिते यांच्या नावाचे पत्रही महापौरांना सहा महिन्यांपूर्वी सादर करण्यात आले आहे. मात्र, तरीही नियुक्तीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सहा महिन्यांपासून प्रथमेश गिते वेटिंगवर आहेत. मात्र, आता आणखी किती वेटींग करणार म्हणून विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
धुळ्याचाही रखडला होता प्रश्न
मागील आठवड्यात धुळे महानगरपालिकेला विरोधी पक्षनेता मिळाला. गेल्या आठ महिन्यांपासून तिथलाही निर्णय झालेला नव्हता, तोही प्रश्न उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेला चार आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा लागला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर धुळे महापालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी शिवसेनेचे नगरसेवक दीपक उर्फ बंटी खोपडे यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती केली. नाशिकमध्ये उबाठाने न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याची तयारी केल्याने आता हालचाली गतिमान झाल्या आहेत.
नाशिकमध्ये तिढा सुटण्याची अपेक्षा
नाशिकमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडल्याने कॉंग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली. काँग्रेस गटनेते सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सहा आठवड्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच धर्तीवर सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेता निवडीबाबतचा तिढाही सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सभागृहनेता पदाची निवड
विरोधी पक्षनेते पदाबरोबरच सभागृहनेतेपदाची देखील निवड नाशिकमध्ये झालेली नाही. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडीपासून प्रलंबित असलेल्या या दोन्ही पदांच्या निवडीची घोषणा महापौरांकडून येत्या महासभेत होणार का, याकडे इच्छुकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. सभागृहनेते पद हे सत्ताधारी पक्षाकडेच असते. त्यामुळे भाजपमध्ये या पदासाठी स्पर्धा आहे.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर गुरमित बग्गा आणि चंद्रकांत खोडे यांची नावे या शर्यतीत आघाडीवर असून निष्ठावान युवा चेहरा म्हणून अजिंक्य साने यांचाही विचार होऊ शकतो. ऐनवेळी पक्षाकडून एखादा नवा चेहरा पुढे आणला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.