Nashik MLC Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरला असतानाही महायुतीमधील विधानपरिषदेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. विशेषत: नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे या तीन जागांवरुन महायुतीत चर्चा सुरु होती. लवकरच या जागांवर तोडगा निघेल असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. मात्र, अद्याप नाशिकच्या जागेचा पेच सुटलेला दिसत नाही असे संकेत आता मिळाले आहेत.
अद्याप महायुतीमधील अधिकृत जागा वाटप घोषित झालेलं नाही. अधिकृतपणे उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. असे असताना आता नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. भाजपचे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडून एक व अपक्ष एक असे दोन अर्ज त्यांनी दाखल केले. गणेश गितेंनी भाजपकडून अर्ज भरुन नाशिकच्या रणधुमाळीतील ट्विस्ट वाढवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमचे उत्तर महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन यांच्यासोबत माझी या जागेबाबत यापूर्वी चर्चा झाली होती. या जागेसाठी त्यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय अशी माहिती गिते यांनी अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दिली. आमच्याकडे संख्याबळ असल्याने आम्ही या जागेसाठी आग्रही आहोत अशी भूमिका गिते यांनी मांडली.
एकीकडे नाशिकच्या जागेवर शिवसेनेने देखील आपला दावा सांगितला आहे. भाजपने संख्याबळाचा दाखला देत दावा सांगितला आहे. तर शिवसेनेने गेल्यावेळी आमचा आमदार होता, त्यामुळे याहीवेळेला ही जागा आम्हाला हवी म्हणून दावा सांगितला आहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, अंजुम कांदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात दराडे यांना एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याने त्यांची उमेदवारी फायनल असल्याचे बोलले जात आहे. दराडेंकडून प्रचाराची रणनिती देखील आखली गेली आहे. नरेंद्र दराडे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. असे असताना इकडे भाजपकडून गणेश गिते यांनी शनिवारीच अर्ज भरल्याने नाशिकच्या जागेवरुन संभ्रम आणखी वाढला आहे.
गिते यांनी भाजपकडून अर्ज दाखल केल्याने नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना-भाजप मध्ये मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.