Gokul Gite Files Independent Nomination Nashik MLC Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election : नाशिक विधानपरिषदेत अखेरच्या अर्ध्या तासात चित्र पालटले, गोकूळ गितेंनी गेलेली हवा भरली...

Nashik MLC Election, Gokul Gite, Independent nomination : नाशिक विधानपरिषेदेच्या रिंगणातून महाविकास आघाडीने माघार घेतली तर भाजपचे गणेश गिते यांचे बंधू गोकूळ यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिकची जागा महायुतीत शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे सुरुवातीला ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होईल असे वाटत होते.

नरेंद्र दराडेंच्या विरोधात उबाठाचे माजी आमदार अनिल कदम किंवा वसंत गिते यांचे आव्हान राहील ते अर्ज दाखल करतील असे वाटत होते. पण अचानक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुकीत माघार घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज दाखल करायला आले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने विरोधकच नसल्याने नाशिकच्या निवडणुकीची हवाच गेली.

परंतु अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मुदतीच्या शेवटच्या अर्ध्या तासात नाशिकच्या रणधुमाळीत भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकूळ गिते यांनी एण्ट्री घेतली. त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अन् नाशिकच्या निवडणुकीची गेलेली हवा गोकुळ गिते यांच्या एण्ट्रीने पुन्हा भरली गेली. यानिमित्ताने नरेंद्र दराडे यांच्यासमोर एक नवं आव्हान येऊन उभ राहिलं.

महायुतीच्या जागावाटपात नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्याने गणेश गितेंना एबी फॉर्म मिळण्याची शक्यता धूसर झाली. त्यात गिते यांच्यावर पक्षाचा दबाव आहे. अशा परिस्थितीत गणेश गितेंनी गोकूळ गितेंच्या रुपाने नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. कारण गोकूळ यांच्यावर कोणत्याही पक्षाचा दबाव नाही.

त्यातच गोकुळ गिते यांच्या अर्जावर मालेगावच्या नगरसेवकांनी सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली असून, त्यामुळे उबाठाच्या नगरसेवकांचा गोकुळ यांना पाठिंबा असल्याची चर्चा अर्ज भरण्याच्या वेळी रंगली होती.

पक्षाचा दबाव असल्याने गणेश गिते हे निवडणूकीतून माघार घेण्याची शक्यता असून अपक्ष गोकूळ गिते विरुद्ध महायुतीचे नरेंद्र दराडे अशी फाईट नाशिकमध्ये रंगू शकते. गोकूळ गिते यांच्या उमेदवारीमागे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची कोंडी करण्याची रणनीती आखली जात असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेतली असली, तरीही मतदानाच्या वेळी गिते यांना अनुकूल मतदान होण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक संपर्काच्या बळावर लढणार

महाविकास आघाडीकडून आपल्याला प्रस्ताव आलेला नाही. सर्वपक्षीय मतदारांशी असलेल्या संपर्काच्या बळावर निवडणूक लढवत असून मतदारांना माझी भूमिका समजावून सांगणार असल्याचे गोकूळ गिते यांनी म्हटले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा इतिहास बघता बहुमत असलेला उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे माझ्याकडे बहुमत नसले तरी मी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देऊन रिंगणात कायम राहील अशी भूमिका गोकूळ गितेंनी घेतली आहे.

९ जण रिंगणात, माघारीकडे लक्ष

नाशिक विधानपरिषदेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकूळ गिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोरख बोडके, विष्णू म्हैसधुणे, भाजपचे गणेश गिते, प्रसाद हिरे यांच्यासह एकुण ९ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच नाशिक निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT