Gokul Gite, Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : माघार शब्द डिक्शनरीत नव्हता.. पण ती घ्यावी लागली... गोकुळ गितेंवर 5 गोष्टींच्या दबावाची शक्यता

Gokul Gite Withdraw Nashik MLC Election : मी लढणारच असा पवित्रा घेऊन अपक्ष शड्डु ठोकणाऱ्या गोकुळ गिते यांनी अखेर गुरुवारी आपण प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले अन् नरेंद्र दराडेंचा मार्ग सोपा केला.

Ganesh Sonawane

माघार शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही असा दावा करणारे नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी काल गुरुवार (दि. ११) प्रचार थांबवण्याची घोषणा करीत राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना पुर्णविराम दिला. नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंब्याचा उच्चार मात्र, गोकुळ गितेंनी केला नाही. त्यामुळे महायुतीमधील समेटाबाबत अद्याप काहीसा संभ्रम कायम असल्याची चर्चा रंगली आहे.

आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रचार थांबवत असल्याचा दावा गिते यांनी केला असला तरी त्यांच्या देहबोलीतून त्यांच्यावरील दबाव स्पष्ट दिसत होता. निवडणुकीतून माघार घेणाऱ्या गोकुळ गितेंवर 5 गोष्टींच्या दबावाची शक्यता वर्तवली जात आहे.

1. महाजनांचा बचाव

गिते निवडणुकीत कायम राहिले असते, तर पराभवाची जबाबदारी माझ्यावर आली असती, अशी कबुली मंत्री गिरीश महाजनांनी काल पत्रकारपरिषदेत दिली. गिते कुटुंब आणि महाजन यांचे कौटुंबिक संबंध आहेत. अशात महायुती व शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना गोकुळ गिते यांच्या बंडामागे गिरीश महाजन यांचा हात असल्याचा संशय बळावला होता. महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर महाजन यांच्यावर फोडले गेले असते, महाजनांचा बचाव करण्यासाठी गिते कुटुंबाला चार पावलं माघार घ्यावी लागली हे यातून स्पष्ट होतं.

२. भावासाठी माघार

गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांच्यावर म्हाडा फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल आहे. म्हाडाला आवश्यक तो भूखंड न देता फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. उच्च न्यायालयाने गिते यांना या प्रकरणात अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. हा जामीन रद्द करण्यासाठी शासनाने सरकारी अभिवक्त्यांकडे कायदेशी सल्ला मागवला होता. तो दि. ४ जून रोजी मिळाला. त्यानुसार गिते यांच्या जामिनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागता येईल, असे नमूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. त्यावरूनच गिते यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असे समजते.

३.तीन मंत्र्यांची शिष्टाई-आमदार कांदेंचा रेटा

नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या गोकुळ गिते यांच्यासमोरच मंत्री महाजन व सामंत यांनी दराडे कुटुंबियांना सज्जड दम भरला व समज दिली. तीन्ही मंत्र्यांनी या वादात मध्यस्थी केली. गोकुळ गिते व दराडे यांची काल समोरसमोर चर्चा घडवून आणली... त्यातून गोकुळ गिते यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांनी गोकुळ गिते यांची मनधरणी करण्याचा सासत्याने प्रयत्न केला. पक्षाचा दबाव वाढल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनीही गोकुळ गिते यांच्यामागे 'योग्य निर्णय घ्यावा लागेल' असा रेटा कायम ठेवला. याच मनधरणीतून न कळत गोकुळ गिते यांच्यावर दबाव निर्माण होत होता. महाजन व सामंत यांच्या नाशिक वाऱ्या थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. त्यातून गोकुळ गिते यांची बंडखोर प्रतिमा तयार होत होती. हीच बंडखोर प्रतिमा कायम ठेऊन निवडणूक लढवणे गोकुळ गिते यांना जड गेलं असतं. तीन्ही मंत्र्यांनी केलेल्या मध्यस्तीतून व काढलेल्या समजूतीतून गोकुळ गिते यांची माघारीची मानसिकता तयार झाली असावी.

४. शिंदे -फडणवीस मनधरणी

सुरुवातीला तीन्ही मंत्र्यांच्या शिष्टाईला फळ मिळत नव्हतं. मंत्री महाजन व सामंताच्या नाशिक वाऱ्या फेल जात होत्या. गोकुळ गिते लढण्यावर ठाम होते. म्हणून दराडे कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांवर अवलंबून न राहाता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फील्डींग लावली.

नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी मंगळवारी मुंबईत सीएम फडणवीसांची भेट घेतली. किशोर दराडेंना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ९९.९९ टक्के गिते पाठिंबा देतील आणि अगदी दिलाच नाही तर महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्यांनी विजय करु . ती जबाबदारी आमची असल्याचं सांगत आमदार दराडेंना आश्वस्त केलं. तेथून मग चक्रे वेगाने फिरली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही खास आपल्या स्टाईल मध्ये गिते यांना समजावल्यावर अखेर गिते यांना आपली तलवार म्यान करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

५. जळगावचा तिढा

नाशिकमध्ये गोकुळ गिते यांनी बंडखोरी केल्याने जळगावात शिवसेनेने बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचा अर्ज कायम ठेवला. त्यातून मंत्री महाजन यांचे शिलेदार व जळगाव विधानपरिषदेचे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर मतविभाजनाचे आव्हान निर्माण झाले. गोकुळ गिते यांनी नाशिकमधून माघार घेतल्यास मीही जळगावमधून माघार घेईल अशी भूमिका रेश्मा काळे यांनी घेतली होती. त्यातूनच गोकुळ गिते यांच्यावर माघारीसाठी दबाव निर्माण झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT