Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार गोकुळ गिते माघार घेण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही दिवासांपासून महायुतीचे नेते गोकुळ गिते यांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची शिष्टाई फळाला येत नव्हती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईनंतर गोकुळ गिते यांनी थांबण्याची तयारी दाखवल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, शिवसेनेचे उदय सामंत हे आज पुन्हा नाशिकमध्ये येत आहेत. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोकुळ गिते पत्रकारपरिषद घेऊन याबाबत आपली अधिकृत भूमिका मांडणार आहे.
नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली तेथून सगळी चक्रे फिरल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर गोकुळ गिते यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर गिते आता निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे यांची भेट घेण्यापूर्वी गिते यांनी नरेंद्र दराडे हे निष्क्रिय उमेदवार असल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात कोणतीच कामे केली नाहीत, असा दावा गिते यांनी केला. आपण निवडून आल्यात जमा असून निकालाच्या तारखेला आमदार झालेले असू असा विश्वास गिते यांनी व्यक्त केला होता.
मंत्र्यांच्या दबावानंतर दराडेंना पाठिंबा देणार का यावर बोलताना त्यांनी आपण निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, मात्र वरिष्ठांच्या शब्दाला मान म्हणून व माझ्या भावासाठी मी एकवेळ घरी बसू शकतो मात्र, पाठिंबा देणार नाही असे विधान केले होते. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत गोकुळ गिते नेमकी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
गिते हे दराडे यांना पाठिंबा जाहीर करतात की केवळ फक्त प्रचार थांबवण्याची घोषणा करतात हे पाहावे लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गिते केवळ प्रचार थांबवण्याची शक्यता आहे. दराडेंना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता कमी आहे. पाठिंबा न दिल्यास नरेंद्र दराडे यांची धडधड माघारीनंतरही कायम राहणार आहे.
आपण घरात बसलो तरी मतदार आपल्याला निवडून देतील. माझा मित्र-परिवार या निवडणुकीत उतरला आहे. असं गोकुळ गितेंनी म्हटलं होतं. गिते यांनी प्रचार न करण्याची भूमिका घेतली तरी प्रत्यक्षात मत पत्रिकेवर गिते, दराडे व हिरे तिघांचे नाव असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.