Devidas Pingale News: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने खेळी केली आहे. त्या खेळीने महायुतीत गोंधळ आहे. त्यामुळे 26 वर्षांपूर्वी घडलेला एक राजकीय चमत्कार पुन्हा चर्चेत आला आहे.
विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदार संघात शिवसेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा महायुतीने शिंदे पक्षाला सोडली. मात्र भाजप आणि त्यांचा एक मित्र पक्ष पडद्यामागून निवडणूक रिंगणात उतरेल, असे संकेत दिले आहेत.
या निवडणुकीत महायुतीच्या दराडे यांच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक गोरख बोडके मैदानात आहेत. भाजपचे गणेश गीते अर्थात त्यांचे बंधू गोकुळ गीते उमेदवार आहेत. गीते यांनी आपण भाजपचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा उमेदवार शेवटपर्यंत टिकला तर चमत्कार घडू शकतो.
गटबाजीतून काय होऊ शकते? याचा प्रत्यय 26 वर्षांपूर्वी नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत सबंध महाराष्ट्राने घेतला आहे. त्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या देविदास पिंगळे यांनी चमत्कार घडवला होता. या चमत्काराने पुढचे काही वर्ष महाराष्ट्रात श्री पिंगळे हिरो म्हणून चर्चेत होते.
शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. लगेचच २००० मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. नाशिकला महापालिकेत शिवसेना, भाजप पक्षाचे महापौर वसंत गीते होते. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. नाशिकच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दरारा आणि ताकद होती.
यावेळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुरेश खेताडे हे एकमेव नगरसेवक होते. पक्षाकडे अवघी दोन मते होती. (कै) गोपाळराव गुळवे जिल्हा परिषद अध्यक्ष, पुष्पाताई हिरे पालकमंत्री आणि (कै) डॉ वसंतराव पवार खासदार होते. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी गुळवे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेने महापौर वसंत गीते यांना मैदानात उतरवले होते. या प्रबळ उमेदवारांपुढे कोणाचीही डाळ शिजणार नाही अशी स्थिती होती.
मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीने देविदास पिंगळे यांना उमेदवारी देण्याचा जुगार खेळला. काँग्रेसचे अनेक नेते पडद्यामागून पूर्वाश्रमीच्या पिंगळे यांच्या मागे होते. पिंगळे यांनी मनसोक्त लक्ष्मी दर्शन आणि आपली कौटुंबिक यंत्रणा राबवली. काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते मैदानात पक्षाच्या उमेदवारांचा मतांची बेगमी करीत होते. संख्याबळ त्यांच्या बाजूने होते.
प्रत्यक्ष निकाल जाहीर झाला तेव्हा दोन मते असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पिंगळे यांना 231 मते मिळाली. शिवसेनेचे गीते दुसऱ्या क्रमांकावर तर दिग्गज आणि काँग्रेसचे प्रभावी उमेदवार गुळवे तिसऱ्या क्रमांकावर गेले. राजकारणात पिंगळे यांनी घडवलेला हा चमत्कार भल्या भल्या नेत्यांना तोंडात बोट घालायला लावणार होता.
या निवडणुकीतून गुळवे यांना मोठा धक्का बसला तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सध्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असलेल्या एका नेत्याला विश्रामगृहावर बेदम चोप दिला होता. पुढे काही वर्ष पिंगळे राज्याच्या राजकारणात हिरो म्हणून चर्चेत राहिले. आजही नेत्यांच्या डोळ्यापुढे ती निवडणूक चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे तरळून जाते. त्याला आजची स्थिती कारणीभूत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.