Nashik MLC News: नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अनपेक्षित पराभव केला. या निकालानंतर नरेंद्र दराडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुतीतील काही नेत्यांनीच विश्वासघात केल्याचा आरोप केला.
दरम्यान, या राजकीय घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देण्याऐवजी मिश्किल अंदाजात उत्तर दिले. पत्रकारांनी “नाशिकमध्ये शिंदे गटाला धक्का बसला, काय म्हणाल?” असा प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे यांना हसू आवरता आले नाही. त्यांनी दाढीवर हात फिरवत सूचक प्रतिक्रिया दिली आणि “ये तो सिर्फ ट्रेलर है...” असे म्हणत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावल्याची चर्चा रंगली.
यावेळी पत्रकारांनी “भाजपने शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला का?” असा प्रश्नही विचारला. मात्र, आदित्य ठाकरे यांनी थेट उत्तर टाळत केवळ हसून प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या देहबोलीची आणि सूचक वक्तव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतेच शिंदे गटाने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले होते. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले होते. दोन-तृतीयांश संख्याबळाच्या निकषावर त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.
यानंतर झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली होती. “टायगर समोर उभा आहे... काही लोक रोज भुंकत असतात, पण टायगर शिकार करत राहतो,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले होते. आता नाशिकमधील निकालानंतर आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेमुळे शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.