Congress UBT accepted corporator controversy : नाशिक महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीने नाट्यमय वळण घेतलं आहे. कॉंग्रेसचे गटनेते सुफी जीन यांनी भाजपाचे नाशिकरोड येथील माजी नगरसेवक सुनील आडके यांच्या नावाचे पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे एकत्रित गट नोंदणी केलेल्या शिवसेना उबाठा व कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे.
शिवसेना- काँग्रेस शहर विकास आघाडीचे गटनेते केशव पोरजे यांनी आयुक्त मनिषा खत्री यांना पत्र पाठवून बेकायदेशीर शिफारस रद्द करण्याची मागणी केली आहे. गटनेत्यांकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत होती. शिवसेना (उबाठा)-काँग्रेस आघाडीला विभागीय आयुक्तांनी ५ फेब्रुवारीला मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेना किंवा काँग्रेसचा स्वतंत्र गट आता महापालिकेत अस्तित्वात नाही. असे असतानाही सदस्य सुफियान जीन यांनी स्वतःला काँग्रेस गटाचे गटनेते भासवून तीन व्यक्तींची नावे नामनिर्देशित सदस्यपदासाठी सूचित केल्याचा आरोप पोरजे यांनी केला आहे.
एकदा आघाडी स्थापन झाल्यानंतर तिच्या सदस्याला बाहेर पडता येत नाही. असे केल्यास तो सदस्य अपात्र ठरतो, अशी कायद्यात तरतूद आहे. जीन यांनी केलेली शिफारस विचारात घेऊ नये, ती आपल्याच स्तरावर रद्द करावी, अशी मागणी पोरजे यांनी केली आहे. अन्यथा संगनमताने निर्णय घेतल्याचा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच जीन यांना अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोरजे यांनी म्हटलं आहे.
नेमका विषय काय?
शिवसेना(उबाठा) व कॉंग्रेसने एकत्रित गटनोंदणी केली आहे. उबाठाचे केशव पोरजे हे या गटाचे गटनेते आहेत. मात्र, स्वीकृतच्या दोन्ही जागांवर ठाकरे सेनेचा दावा सांगत पोरजे यांनी हेमंत गायकवाड व बाबासाहेब गायकवाड अशी दोन नावे निश्चित करुन आयुक्तांकडे ती सादर केली.
महापालिकेतील पक्षीय तौलानिक बळानुसार भाजपने प्रवक्ते अजित चव्हाण, संदीप लेनकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव अशी सहा जणांची नावे निश्चित केली. तर, शिंदेसेनेच्या वतीने चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव ही दोन नावे निश्चित करुन त्यानुसार आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे गटनेत्यांनी पत्रे दिली.
याच दरम्यान, कॉंग्रेसचे सुफी जीन यांनी आपले अकरावे नाव दिले. विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे कार्यकर्ते सुनील आडके यांचे नाव दिले. त्यावर उद्धवसेनेचे गटनेते केशव पोरेजे यांनी आक्षेप घेतला असून सुफी जीन यांना परस्पर स्वतंत्र्य कॉंग्रेस गटाच्या वतीने शिफारस करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. ही शिफारस स्विकारल्यास मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा केशव पोरजे यांनी आयुक्त मनिषा खत्री यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.