Mukesh Shahane , Deepak Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Election : दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणेंमध्ये होणार 'टाइट फाइट', कोण कुणाला करणार चितपट?

Deepak Badgujar Vs Mukesh Shahane : एबी फॉर्मच्या गोंधळात भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. परंतु त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांच्याविरोधत अपक्ष शड्डू ठोकला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : भाजपचा एबी फॉर्म मिळूनही अपक्ष निवडणूक लढवावी लागणाऱ्या माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासाठी प्रभाग २९ 'अ' मधील निवडणूक आता अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेतून (उबाठा) भाजपमध्ये गेल्यावर्षी प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचे आव्हान आहे. एबी फॉर्मच्या गोंधळानंतर आता हा प्रभाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला आहे. संपूर्ण नाशिकसह जिल्हा आणि राज्याचे लक्ष या लढतीकडे लागलेले आहे.

सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर हे या प्रभागात भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपचेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांनी दीपक बडगुजर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या एबी फॉर्मचा मोठा गोंधळ उडाला होता. या एकाच प्रभागात दीपक बडगुजर व मुकेश शहाणे या दोघांनाही भाजपकडून एबी फॉर्म मिळाले होते. मात्र, प्रत्यक्षात शहाणे यांच्या आधी दीपक बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक नियमानुसार ज्या उमेदवाराने आधी अर्ज दाखल केला, त्याचा एबी फॉर्म ग्राह्य धरला जातो तर इतरांचे अर्ज बाद करण्यात येतो. त्यानुसार दीपक बडगुजर यांनी आधी अर्ज दाखल केल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला व मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरला.

शहाणे निवडणूक लढवण्यावर राहिले ठाम

एबी फॉर्मच्या या गोंधळानंतर मुकेश शहाणे हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यांचे बंड शांत करण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केला. मात्र महाजन यांनाही त्यात अपयश आलं. भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर यांच्या विरोधात मुकेश शहाणे यांनी अपक्ष शड्डू ठोकला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा पॉझिटिव्ह झाली. पण मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. गुलाल उडवल्याशिवाय थांबणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

बडगुजर–शहाणे संघर्षाची चर्चा राज्यभर

एबी फॉर्मच्या वाटपातील कथित गोंधळ, अंतर्गत वाद आणि बडगुजर–शहाणे संघर्षाची चर्चा राज्यभर झाली. आता निवडणूक प्रचारातही बडगुजर-शहाणे दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जाताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना निवडणुकीत चितपट करण्याची भाषा करताना दिसत आहेत. त्यामुळे ही लढत रंजक बनली असून नक्की कोण कुणाला चितपट करणार हे निकालाच्या दिवशीच म्हणजे १६ जानेवारीलाच कळेल. दरम्यान नाशिककरांचे या लढतीकडे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT