Nashik News: नाशिक महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगळे लढत आहेत. त्यासाठी अनेक रणनीती आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये शिंदे सेनेनं मोठी खेळी केली आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या नेत्याला एकनाश शिंदे यांनी गळाला लावला. त्यामुळं नाशिकमध्ये आता वेगळे राजकीय वारे वाहायला लागले आहेत.
नाशिकमध्ये शिंदे सेनेनं मोठी खेळी करत छगन भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या कैलास मुदलियार यांना आपल्या बाजूनं वळवण्यात यश मिळवलं आहे. मुदलियार आज शिंदे सेनेत प्रवेश केला. मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित कैलास मुदलियार यांनी नाशिकच्या शिवसेना कार्यालयात प्रवेश केला. नाशिकमध्ये भाजप-शिवसेने युती होण्याची चिन्हं नाहीत, त्यामुळं शिंदे सेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु आहे किंवा मग सेनेकडून स्वबळावर लढण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, नाशिक महापालिकेत जागा वाटपावरुन भाजपची शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा फिस्कटली आहे. भाजपनं या दोन्ही पक्षांमधील माजी नगरसेवक पक्षात घेतल्यानं भाजपची ताकद वाढली असून त्यांचा जागेचा आकडा हा ९० पर्यंत पोहोचला आहे. तत्पूर्वीच ८२ जागांवर भाजप ठाम होती, गिरीश महाजन यांनी आपला हा आकडा दोन्ही मित्रपक्षांना दिला होता. तर शिवसेनेनं ४५ आणि राष्ट्रवादीनं ३५ जागा मागितल्या होत्या.
नाशिक महापालिकेत एकूण १२२ जागा आहेत. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता होती, त्यामुळं आता महायुतीत तीन पक्ष असले तरी जागांबाबत तडजोड करण्यास भाजप तयार नाही. त्यामुळं महायुतीतील भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन अद्याही चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीसोबतच्या चर्चेबाबत बोलताना दादा भुसे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून मी बोललो. काही मुद्द्यावर चर्चा आम्ही केली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही बैठक घेतली. वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य आहे. नाशिकमध्ये आम्ही भाजपसोबत 50 जागांची मागणी केलेली आहे. त्यात 45 जागा आम्ही मागितल्या आहेत, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की भेटून चर्चा करायला पाहिजे म्हणून आम्ही भेटून बोललो. फक्त आम्ही चर्चा केलेली आहे. भाजपला आम्ही डावलले नाही. 45 जागांची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय आम्ही मान्य करू. आम्ही राष्ट्रवादी सोबत चर्चा केली, ही वस्तुस्थिती आहे. मला त्या संदर्भात माहिती नाही, असंही भुसे यांनी सांगितलं.
२०१७ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेला धोबीपछाड देत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत भाजपला ६७ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेना ३४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ६ आणि काँग्रेसला ६ जागा तर मनसेला ५ जागा मिळाल्या होत्या. तत्पूर्वी २०१२ च्या महापालिका निवडणुकीत मनसेला ३९ जागा मिळवून सत्ता स्थापन करत महापौरपदही मिळवलं होतं. नाशिकसाठी मनसेनं विकासाची ब्लुप्रिंट मांडली होती. तसंच गोदाकाठचा विकासही केला होता. पण या कामानंतर काही दिवसांतच गोदावरीला आलेल्या पुरामध्ये हे सर्वच काम वाहून गेलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.