Nashik News : दीर्घकाळ एकाकी आयुष्य जगणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नागापूरमधील नितीन गरुड आणि प्रतिभा (प्रमिला) धुराडे यांच्या आयुष्यात गावकऱ्यांनीच आनंदाची नवी पहाट आणली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व जिल्हा परिषद नाशिकच्या नवचेतना अभियानांतर्गत एकल महिला – एकल पुरुष आंतरजातीय विवाह सोहळ्यात नुकतीच नितीन गरुड व वधू प्रमिला धुराडे यांना गावकऱ्यांच्या साक्षीने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात हा विवाह सोहळा झाला. जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार हे स्वत: या लग्नात वऱ्हाडी झाले. त्यांच्या उपस्थितीतच हा विवाह सोहळा पार पडला. नाशिक जिल्ह्यात सध्या या विवाहाची चर्चा आहे.
वर नितीन गरुड यांच्या पत्नीचे सुमारे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते, तर वधू प्रतिभा यांच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने दोघेही दीर्घकाळ एकाकी जीवन जगत होते. त्यांच्या मुलांचे विवाह होऊन ते स्वतंत्र संसारात स्थिरावल्यानंतर या दोघांच्या आयुष्यातील एकटेपणाची दखल गावपातळीवर घेण्यात आली. लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांनी पुढाकार घेत संबंधितांशी चर्चा करून त्यांना विवाहासाठी प्रोत्साहित केले. समाजानेच पुढाकार घेत हा विवाह घडवून आणल्याने हा सोहळा गावासाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला.
आज मानवाने तंत्रज्ञानाच्या साह्याने अभूतपूर्व प्रगती साधली असली, तरी समाजाच्या काही स्तरांमध्ये आजही जुन्या चालीरीतीचा पगडा असल्याचे आढळून येते, आधुनिक युगातही विधुर किंवा विधवा विवाहाबाबत संकोचाची भूमिका अनेक ठिकाणी दिसून येते. समाजमाध्यमांमुळे माणसे आभासी पातळीवर जोडली गेली असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एकाकीपणाची भावना वाढत आहे, या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या बाबतीत संवेदनशील समाजाची निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘नवचेतना अभियान’ राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. संतपरंपरेने जाती, धर्म आणि वर्गभेदांच्या भिंती पाडत समतेची व बंधुभावाची शिकवण समाजात रुजवली. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत, निर्धारपूर्वक सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून ‘नवचेतना अभियान’ सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून, तसेच शासनाच्या सक्रिय सहभागातून, येथे एक अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न झाला. या उपक्रमाने समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण करत समतेचा आणि मानवतेचा प्रभावी संदेश दिला आहे. (Nashik News)
विशेष म्हणजे विविध अठरापगड समूहांचे सहअस्तित्व असलेल्या नागापूर गावाने स्वतः पुढाकार घेत जातीयतेच्या पलीकडे जाऊन हा विवाह सोहळा पार पाडला. समाजातील सर्व घटकांनी दिलेल्या पाठबळामुळे हा सोहळा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नवा अध्याय ठरला नाही, तर सामाजिक एकात्मता, परस्पर सन्मान आणि प्रगत विचारसरणीचे जिवंत उदाहरण ठरला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख फरान खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी श्रीकिसन खातळे नागापूरचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार, उपसरपंच निलेश पवार, ग्रामविकास अधिकारी दिलीप निकम यांसह अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा विवाह सोहळा सर्वसाधारण लग्नाप्रमाणेच थाटामाटात पार पडला. संबळे व पारंपरिक वाद्यांच्या निनादात विधी पार पडले, अतिथींचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. बॅंड, वाजंत्री, पारंपरिक चालीरीती, आशीर्वाद आणि लग्नानंतरची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी झाला. ग्रामस्थांनी हा सोहळा आपल्या कुटुंबातीलच समारंभ असल्याप्रमाणे साजरा केला. लग्नानंतर सामूहिक भोजन ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आले. या आंतरजातीय विवाहासाठी नागापूर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष योजना म्हणून ‘सरपंच शुभमंगल योजना’अंतर्गत रुपये अकरा हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते नवदांपत्यास प्रदान करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.