Nashik BJP News: नेहेमीच चर्चेत राहणारे भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आले. त्यांना नाशिकच्या भाजप नगरसेवकांच्या अव्यक्त नाराजीलाही सामोरे जावे लागले. त्याला कारणही तसेच गंभीर घडले होते.
नाशिक शहरात दोन दिवसांपासून मुसळधार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावर पावसाचा कहर आहे. सबंध शहराला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.
शहर पुराने आणि पावसाने त्रस्त आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांसह महापौर हिमगौरी अडके, उपमहापौर विलास शिंदे यांचे संबंध प्रशासन शहरातील व्यवस्था सुरळीत करण्यासाठी झटत आहेत. अनेक अधिकारी आणि नगरसेवक रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करीत आहेत.
मात्र या सगळ्यांमध्ये आज सत्ताधारी भाजप नगरसेवकांना वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. शहरात मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त व संकटात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शहरात आगमन झाले. त्यांनी सर्व नगरसेवकांना हातातली सर्व कामे सोडा आणि माझ्या बैठकीला या, असे फर्मान सोडले.
किरीट सोमय्या यांनी थेट महापालिका कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी थेट उपयुक्त चौधरी यांचे कार्यालय गाठले आणि त्याचा ताबा घेतला. त्यानंतर सर्व नगरसेवकांना तातडीने बैठकीला बोलावून मतदार याद्यांच्या एसआयआर दुरुस्तीचा विषय सुरू केला.
यावेळी अनेक नगरसेवक आपल्या प्रभागात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. काही नगरसेवक प्रभागात झोपडपट्ट्या आणि वस्तीत पाणी शिरल्याने मदतीला गेले होते. या सगळ्यांना सर्व कामे सोडून तातडीने बैठकीला येण्याचा हुकूम सोडण्यात आला होता.
भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीला हजर राहण्याचा प्रयत्न केला. अपेक्षित नगरसेवकांची संख्या न दिसल्याने सोमय्या यांनी आपल्या शैलीत संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. बैठकीच्या ठिकाणी गेलेल्या पत्रकारांनाही कक्षातून बाहेर काढण्यात आले.
यावेळी सोमय्या यांनी नगरसेवकांना सर्व कामे बाजूला ठेवून एसआयआर हा प्राधान्याचा विषय आहे. आगामी निवडणुकीच्या पक्षासाठी नगरसेवकांनी मतदारयादीत नको असलेले मतदार कसे ओळखावे, काय प्रक्रीया राबवावी यासाठी सूचना करण्यास सुरुवात केली.
यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त करण्याचा मोह कसाबसा आवरला. मात्र शहर पाऊस आणि पुराच्या संकटात असताना सोमय्या यांची अचानक झालेली ही बैठक, उपस्थीतीसाठी चांगलीच चर्चेचा विषय ठरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.