Nashik Municipal Corporation street light issue: आर्थिक अडचणींमुळे नागरिक वीज बिल भरण्यात विलंब केल्यामुळे महावितरण अशा ग्राहकांची वीज खंडित केल्याच्या घटना पाहायला मिळतात मात्र असा प्रसंग चक्क नाशिक शहरावर ओढवला. महापालिकेच्या रस्त्यांवरील दिवे बंद असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर बीज वितरण कर्मचारी पुरवठा खंडित करून अनेकांना धडा शिकवण्याचे प्रसंग दिसतात. मात्र नाशिक महापालिकेवरील असा प्रसंग येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मंगळवारी शहरात असा प्रसंग घडला. त्यामुळे दुष्काळामुळे आधीच हैराण झालेले नाशिककर आणखी मोठ्या संकटात सापडले.
विज बिल थकल्यामुळे महावितरणने चक्क नाशिक महापालिकेच्या पथदिपांचा पुरवठा खंडित केला. त्यामुळे शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. दिवसभर वाहतूक सिग्नल बंद झाल्याने नागरिकांवर मोठे संकट ओढवले.
या संदर्भात नाशिक महापालिकेने यापूर्वीच बिल भरल्याचा दावा केला आहे. मात्र, संबंधित यंत्रणेने मात्र बिल अदा केले नसल्याने पुरवठा खंडित झाला, असे कळविले. या शासनाच्या दोन यंत्रणेतील विसंवादात शहर वाहतूक कोंडीत अडकले होते. नाशिक शहरात सध्या 28 रस्त्यांची कामे सुरू असल्याने ते बंद आहेत. याशिवाय शहरातील दोन प्रमुख चौक वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना रोजच कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
आतापर्यंत शहरातील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले आहे. अशा स्थितीत काल दिवसभर शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्ते अत्यंत अरुंद आहेत. प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सिग्नल बंद पडले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेवरही मोठा ताण पडला. महापालिका आणि महावितरण यंत्रणेतील विसंवादाने सबंध शहर वेठीस धरण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी शासकीय यंत्रणा परस्परांशी असा व्यवहार करीत असल्याचे पाहून धक्का बसल्याचे सांगितले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने यापूर्वी या प्रश्नावर गंभीर आंदोलन केले आहे. मात्र सत्ताधारी जनतेच्या गैरसोयी ऐवजी स्वतःच्या हितात व्यस्त असल्याचे दुर्दैवी चित्र आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.