Prathamesh Gite News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षात फाटाफूट झाली. त्यानंतरही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिकेत चुणूक दाखवली. पक्षाने विरोधी पक्षनेते पद काबीज केले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिका विरोधी पक्षनेतेपदी प्रथमेश गीते यांची शिफारस केली आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला आव्हान देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. निमित्ताने महापालिकेत उद्धव ठाकरे पक्षाच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपने उद्धव ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांसाठी पायघड्या अंथरल्या होत्या. त्यासाठी सत्तेच्या माध्यमातून अनेक यंत्रणांचा वापर देखील करण्यात आला. त्यानंतरही शिवसेना ठाकरे पक्षाने लढत दिली.
या पार्श्वभूमीवर पक्षाने पुन्हा एकदा निष्ठावंत म्हणून प्रथमेश गीते यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नव्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर १५ जागा जिंकल्या होत्या. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे पक्षापुढे महापालिकेत प्रभावी कामगिरीचे आव्हान आहे.
गेल्या पाच वर्षात शहरातील सर्व उद्याने, रस्ते आणि नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुविधांचा विचार न करता एककल्ली कारभार केला. महापालिकेची गाडी त्या दृष्टीने रूळावर आणण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष काम करेन.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सिंहस्थासाठी चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून काम करू. पालिकेत गैर कारभाराला थारा मिळू नये यासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक प्रयत्न करतील.
विरोधी पक्षनेते म्हणून विरोध नव्हे तर विधायक कामांना आमचा पाठिंबा असेल. मात्र संख्याबळ आणि सत्तेच्या जोरावर कोणी चुकीची कामे रेटली तर त्याला विरोध होणार. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रशासनाला सहकार्य करू. शिवसेना ठाकरे पक्षाचा जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे प्रथमेश गीते यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.