Nashik Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : त्र्यंबकेश्वरनंतर नाशिकचा नंबर ; साधू-महंतांनी जोरदार आग्रह करत केली खास मागणी

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी प्रशासनाकडून जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी साधू-महंतांनी केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik pilgrimage status : भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्रांमध्ये नाशिकचे स्थान महत्त्वाचे असूनही अद्याप त्याला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला नाही. मात्र, 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी साधू-महंतांकडून केली जात आहे.

नुकताच त्र्यंबकेश्वरला 'अ' श्रेणीचा तीर्थक्षेत्र मान मिळाल्यानंतर नाशिकलाही हा दर्जा मिळावा, अशी मागणी पुन्हा जोम धरू लागली आहे. साधू-महंत तसेच आखाड्यांकडून या मागणीसाठी ठाम भूमिका घेतली जात असून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी सुधारित प्रस्ताव संत समुदायाच्या वतीने प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

आगामी कुंभमेळ्यासाठी दोन वर्षांचा कालावधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच तपोवनात आखाड्यांसमवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक घेऊन साधू-महंतांशी चर्चा केली. या बैठकी दरम्यान साधू-महंतांनी हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी केली. हरिद्वारला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने तेथे धार्मिक स्थळांचे संरक्षण, अतिक्रमण रोखणे आणि भाविकांसाठी सुविधा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिकसाठीही हा दर्जा मिळावा, असा आग्रह साधू-महंतांनी यावेळी धरला.

जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीसंदर्भात सकारात्मक पावले उचलत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या प्रस्तावात नाशिकचे धार्मिक महत्त्व, कुंभमेळ्याची परंपरा तसेच भाविकांची मोठी संख्या यांचा उल्लेख करून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. सन 2015 च्या कुंभमेळ्यानंतरपासून नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी प्रलंबित आहे.

तर काय फायदा होईल?

नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास घाट आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणांना आळा बसेल तसेच हरिद्वारच्या धर्तीवर कठोर नियम लागू होऊन धार्मिक स्थळांचे संरक्षण होईल. मुख्य तीर्थक्षेत्र भागात मद्यविक्री व मांसविक्रीवर बंदी येईल, हॉटेल्स व निवासस्थाने भक्तनिवासाच्या स्वरूपात विकसित केली जातील. पर्यटनाच्या नावाखाली होणारे व्यावसायिक शोषण रोखले जाईल, गोदावरी घाटांची स्वच्छता व दुरुस्ती नियमित होईल आणि कायमस्वरूपी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली जाईल. यामुळे नाशिकचा धार्मिक वारसा जपला जाईल व भाविकांना अधिक शिस्तबद्ध आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT