Chhagan Bhujbal Bungalow Security : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Bungalow Security : भुजबळांच्या बंगल्यावर शुकशुकाट; पण पोलिसांचा कडक पहारा

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधानंतर येवल्यात सकल मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

अनुराधा धावडे

Nashik Political News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधानंतर येवल्यात सकल मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांनी आज ग्रामपंचायतींपासून बाजार समित्यांच्या कार्यालयातून त्यांच्या प्रतिमा काढून त्यांवर शाईफेक केली. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात वातावरण अधिकच तीव्र होऊ लागले. हे लक्षात येताच नाशिक पोलिस अलर्टवर आले आहेत.

बीड येथील घटनेमुळे मंगळवारी (ता.३१) सकाळपासूनच भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांच्या बंगल्यात सध्या शुकशुकाट असला तरी कालपासूनच त्या ठिकाणी चार ते पाच पोलिस पूर्णवेळ बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम वेळोवेळी आढावादेखील घेत आहे. छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर संतप्त आंदोलक जमणार असल्याची परिसरात जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या असून, त्यांच्या बंगल्याभोवती चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण नरमगरम असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून भुजबळ मतदारसंघाच्या दौऱ्यावरदेखील आलेले नाही. त्यातच त्यांच्या सोबत असणारे मतदारसंघातील मराठा समाजाचे नेते व पदाधिकारीदेखील आंदोलनात उतरू लागल्याने हादेखील चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधामुळे त्यांची डोकेदुखीही वाढली आहे.

दरम्यान, मतदारसंघातील १०० हून अधिक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच गावोगावी साखळी उपोषणेदेखील सुरू आहे. रास्तेरा सुरेगाव येथे प्राणांतिक उपोषण सुरू असून, आज सकाळी या ठिकाणी संभाजीनगर- नाशिक महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याच मार्गावर येवलाजवळील अंगणगाव येथेही सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- फोटोची तोडफोड, शाईफेक

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात प्रवेश करत सभापतीच्या दालनात व कार्यालयात लावण्यात आलेल्या भुजबळांच्या प्रतिमा काढून बाजार समिती आवारात आणल्या. या ठिकाणी या दोन्ही प्रतिमांची तोडफोड करत प्रतिमांवर शाई फेकून आपला संताप व्यक्त केला. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. या वेळी कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यानंतर कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठले. येथे सभापती दालनात लावलेल्या भुजबळांच्या प्रतिमेसह महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा एकत्रित असल्यामुळे सदरची प्रतिमा सन्मानपूर्वक काढून कार्यालयात जमा करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले यांची नवी प्रतिमा आणून सभापती दालनात सन्मानपूर्वक प्रतिमा बसवण्यात आली आहे. या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळ यांच्या विरोधातदेखील जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT