Himgauri Adke News: नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तीव्र बनला आहे. यावरून शहरात रोजच विरोधकांचे आंदोलन होत आहे. त्यामुळे भाजप चांगलाच अडचणीत आला आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शहरात पाहणी केली. महापालिकेत बैठक घेऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर कंत्राटदारांशीही चर्चा केली.
यावेळी गिरीश महाजन यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांतील वादाच्या प्रश्नात तोडगा काढला. कंत्राटदारांना स्टार रेट देण्याचा निर्णय मंत्र्यांनी घेतला. त्यामुळे कंत्राटदार आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये शहरातील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. या संदर्भात महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे रोजच विविध भागात भेटी देत आहेत. महापौरांनी खड्ड्यांचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात खड्डे बुजविण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या खड्डे बुजवण्याची मोहीम नवा वाद निर्माण करीत आहे. त्यामुळे प्रशासन विरुद्ध नगरसेवक हा लढा आता महापौर विरुद्ध कंत्राटदार असा बनला आहे.
महापौरांनी कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. कुंभमेळा मंत्री महाजन यांनी कंत्राटदारांना स्टार रेट देण्याचे जाहीर केले. त्यामुळे स्टार रेटला विरोध करणाऱ्या सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि महापौराबाबत कंत्राटदार नाराज आहेत. त्यामुळे या कंत्राटदारांनी महापौरांच्या बैठकीकडे पाठ फिरवली.
शहरात 18 प्रमुख कंत्राटदार आहेत. ते खड्डे बुजविण्याचे काम करतात. मात्र यातील अवघे चार कंत्राटदार महापौरांच्या बैठकीला आले होते. त्यावरून महापौर आडके चांगल्यात संतापल्या. वर्षभराचे खड्डे बुजविण्याचे बजेट पावसाच्या खड्ड्यांवरच खर्च करायचे का? असा संतप्त सवाल महापौरांनी या कंत्राटदारांना केला.
आता महापौर आणि उपमहापौरांनी कंत्राटदारांना पुन्हा एकदा तंबी दिली आहे. नागरिकांची गैरसोय करून रस्त्यांवर खड्डे होत आहेत. हे रस्ते तातडीने पूर्ववत करावेत अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एकंदरच कुंभमेळा मंत्र्यांचा सॉफ्ट कॉर्नर प्राप्त होताच कंत्राटदारांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.