NMC News : नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यात साचलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे तब्बल पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका अपघाती निधनासह घडलेल्या या घटनांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. खड्ड्यांच्या बळी ठरलेल्या कोतकर यांच्या कुटुंबियांची महापौर हिमगौरी यांनी भेट घेऊन सांत्वन केले, मात्र या घटनेमुळे मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमधील रोष अधिकच वाढला आहे.
रस्त्यांच्या या गंभीर समस्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत नागरिकांच्या फोटोंसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, गटनेते केशव पोरजे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन मांडले.
शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता अत्यंत तीव्र आणि जीवघेणा बनला आहे. रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचे डांबर वापरणे आणि टक्केवारीचा भ्रष्टाचार यामुळेच रस्त्यांची ही दुर्दशा झाल्याचे आरोप जाहीरपणे तसेच सोशल मीडियावर होत आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. ठाकरे गटाने या मुद्द्यावर महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्याची मागणी केली असून, आंदोलनाच्या दबावामुळे सत्ताधाऱ्यांना ही मागणी मान्य करावी लागली आहे.
या राजकीय नाट्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची चांगलीच अडचण झाली आहे. विकासाच्या नावाखाली सत्तेत सहभागी झाल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाला विरोधकांनी थेट धारेवर धरले आहे. दुसरीकडे भाजपचे नगरसेवकही या कारभारावर अस्वस्थ असून, भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
सत्ताधारी नगरसेवकच आता रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा करू लागल्याने 'महापालिकेत नेमके सत्ताधारी कोण?' असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे शिंदे गटाची राजकीय कोंडी तर दुसरीकडे भाजप रडकुंडीस, अशी अवस्था नाशिक महापालिकेत निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.