Nashik Potholes : नाशिक शहरातील कुंभमेळ्याची विकास कामे हा राजकीय वादाचा विषय ठरला आहे. यातील खड्डे आणि अपघात यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला आव्हान दिले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये केवळ निविदा काढल्या जातात. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतो. जनतेच्या सोयीसुविधांचा कोणताही विचार केला जात नाही, असा आरोप शिवसेनेने केला होता.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या या आरोपाला प्रतिउत्तर दिले. कुंभमेळ्याचे काम पारदर्शी होत असल्याचा दावा त्यांनी केला. संदर्भात संजय राऊत यांनी एकदा तरी मोर्चा काढावा असे आव्हान मंत्री महाजन यांनी दिले होते.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री महाजन यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. येत्या 17 ऑगस्टला शिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार राऊत आणि उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना कार्यालयापासून सकाळी अकराला हा मोर्चा महापालिका कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
कुंभमेळा निमित्त सुरू असलेल्या विकास कामे आणि रस्ते हा वादाचा विषय बनला आहे. या कामांमुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचा आरोप होतो आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत झालेल्या अपघातात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्याला राज्य शासन आणि महापालिका आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महापालिकेच्या सत्ताधारी नेत्यांना आव्हान देणार आहे. या मोर्चात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापौरांसह महापालिका आयुक्तांना जाब विचारण्यात येईल. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्नांवरून नाशिक शहराचे राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.