Nashik-Pune Railway : राजकीय सत्तेचा संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आहेत. सध्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वादाचे असेच उदाहरण देता येऊ शकते. आता याच वादाचा फटका एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला बसणार असे दिसते.
नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन देखील झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कामाला सुरुवात केव्हा होते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. मात्र सध्या तरी ही उत्सुकता राजकीय वाद विवादामुळे शमण्याची चिन्हे आहेत.
हा रेल्वे मार्ग मूळ नाशिक-संगमनेर-चाकण-पुणे असा आहे. त्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला, सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या प्रकल्पाला मंजूरी मिळाली. मात्र आता या प्रकल्पाला नगर जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वादाची किनार आडवी आली आहे.
या प्रकल्पात काही सुधारणा म्हणून शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश करण्यात येईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी नुकतेच सांगितले केले. त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय अडथळा निर्माण केला जात असल्याचा संदेश गेला आहे. नाशिक- पुणे रेल्वे मार्गात संगमनेर हे अपरिहार्यपणे येते. शिर्डी बाजूला राहते. शिर्डीमार्गे हा प्रकल्प गेल्यास रेल्वे मार्गाचे अंतर वाढणार आहे. परिणामी हा प्रकल्प लांबण्याची चिन्हे आहेत.
दोन्ही बाजूंकडून राजकीय श्रेयवादासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे. त्यासाठी असलेली सर्व राजकीय ताकद वापरून सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. राजकीय वादातून हे घडल्याचे लपून राहिलेले नाही. त्याचा फटका जनतेला बसण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी नुकतेच या प्रकल्पाशी संबंधित लोक प्रतिनिधींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे आदींसह सात लोकप्रतिनिधी एकत्र आले होते. या सर्व लोक प्रतिनिधींनी आता प्रकल्प व्हावा म्हणून आपली ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. तो कितपत यशस्वी होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
या प्रकल्पासाठी शिवाजीराव आढळराव पाटील आणि हेमंत गोडसे या दोन खासदारांनी प्रयत्न केले होते. सध्या ते खासदार नाहीत. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. मात्र नगर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे आणि थोरात आणि विखे यांच्यातील पारंपारिक राजकीय संघर्षातून हा मार्ग रोखण्यासाठी अप्रत्यक्ष रेड सिग्नल निर्माण झाला आहे, हे नक्की.
रेल्वे गाड्या लेट होतात. हे नवीन नाही. मात्र रेल्वे प्रकल्प देखील हमखास लेट होतात, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा समावेश आहे. 1997 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी आणि खा. वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला नाशिक रोड येथे प्रारंभ झाला होता.
त्यानंतर या प्रकल्पात एकदा बदल झाला आणि विलंब होत गेला. या दरम्यान, नाशिक-पुणे हॉस्पिटल रेल्वे प्रकल्प आला. तोही सध्या अनिश्चित आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग तब्बल 28 वर्ष लेट झाला आहे. तो कधी पूर्ण होणार हे देखील अनिश्चित आहे. राजकीय सत्ता स्पर्धेचा मोठा अडथळा या मार्गाला निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.