
Nashik Pune train update : पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर संगमनेर (जि. अहिल्यानगर) चे युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षिय नेत्यांची मोट बांधून, जुन्याच सर्वेक्षणानुसार सरळ चाकण, मंचर, नारायणगांव मार्गे रेल्वे होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. या मोट बांधलेल्या नेत्यांमध्ये आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. मात्र या प्रकल्पाचे प्रवर्तक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार तांबे यांनी मंगळवारी (ता.४) ‘एक्स’ वर पोस्ट करत विविध लोकप्रतिनिधींसोबत बैठक झाल्याची माहिती दिली. एक्स वर तांबे म्हणाले,‘‘ नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे, या मागणीसाठी आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीस मंत्री माणिकराव कोकाटे आमदार दिलीप वळसे पाटील(Dilip walse patil), आमदार संगमनेरचे आमदार अमोल खताळ प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला.
बैठकीत एकमताने ठरले की, याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची वेळ घेऊन तातडीने बैठक आयोजित करावी, तसेच दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवयां च्या सोबतही लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झाला. मात्र या बैठकिला आणि यापुर्वी झालेल्या पत्रव्यवहारात माजी खासदार आणि या प्रकल्पाचे प्रवर्तक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निमंत्रित न केल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘‘मी खासदार झाल्यावर पहिल्यांदा २००४ मध्ये पुणे - नाशिक रेल्वेची संकल्पना मांडली. यासाठी संसदेत प्रश्न मांडला. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हा प्रकल्प रेल्वेच्या पिंकबुक मध्ये आला. मात्र तांत्रिक कारणांनी हा प्रकल्प रखडत गेला. हा प्रकल्प पुर्ण होणे हे माझे स्वप्न आहे. मी या प्रकल्पाबात संवेदनशिल आहे. माझा राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. नव्यापिढीतील तरूण लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाची सुरूवात कशी झाली, याचा इतिहास तपासावा, अभ्यासावा.’’ अशी प्रतिक्रिया माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील(Shivajirao Adhalrao Patil) यांनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.