Nashik Pune railway route : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर संगमनेर इथं आयोजित केलेल्या बैठकीला तीन खासदार, दोन माजी खासदार, चार आमदार, एक माजी आमदार, यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवताना, बैठकीतून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी, बैठकीत सहभागी झालेल्या प्रतिनिधींना आश्वस्त केले. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे कृती समिती प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाला भेट देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, संगमनेरचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे बैठकीत नव्हते, त्यांच्याऐवजी पत्नी नीलम खताळ सहभागी झाल्या होत्या.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण या मार्गेच गेली पाहिजे, अशी आपली ठाम मागणी आहे. यासाठी आपल्या जनआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने संगमनेर (Sangamner) इथं सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी बैठकीसाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन केलं होतं. तसेच हा मुद्दा मार्गी लागेपर्यंत, जनआंदोलन करत राहाण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक-शिर्डी रेल्वे मार्ग, अहिल्यानगर-पुणे रेल्वे मार्ग या प्रकल्पांनाही आमचा पाठिंबा आहे. पण, नाशिक (Nashik) व पुणे या दोन औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी, या भागातील विद्यार्थी व नोकरदार वर्गाच्या हितासाठी नाशिक-पुणे रेल्वे पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे सरळ मार्गे होणे अत्यंत गरजेचे आहे.
या दिशेने काम सुरू होऊन जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहणही झालेले आहेत. आता इथून माघार न घेता रेल्वे प्रकल्प सरळमार्गे व्हावा, यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी यांची आज विचार मंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही सर्व प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमची भूमिका मांडणार आहोत. याच वेळी सत्यजीत तांबे यांनी बैठकीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे कृती समिती प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याबाबत आश्वस्त केले आहे.
या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे त्याचप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, अजित नवले, कारभारी नवले, बाजीराव दराडे, कपिल पवार, दत्ता ढगे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.