Sangamner Railway Route : नाशिक–पुणे रेल्वेमार्ग हा संगमनेर मार्गेच व्हावा, हीच आमची ठाम भूमिका असून त्यासाठी सातत्याने संघर्ष आणि पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनेचे (Shivsena) आमदार खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नाशिक–पुणे रेल्वेमार्गाबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी प्रकल्प रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत यापूर्वी मुख्यमंत्र्यांपर्यंत न पोहोचलेली महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे खताळ यांनी सांगितले. सुरुवातीला या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) 50 टक्के निधी देण्यास तयार होते. मात्र, आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा 100 टक्के खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र शासनाने दर्शविली आहे, असा दावा त्यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत पुन्हा बैठक झाली. त्यावेळी जीएमआरटी (GMRT) संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार खताळ म्हणाले. या समितीचा अहवालही सकारात्मक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केल्याचे सांगत खताळ म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार जीएमआरटी परिसरापासून सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरून रेल्वेमार्ग नेण्यास जीएमआरटी प्रशासनाचा कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेल्वेमार्गाबाबत जाणीवपूर्वक अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या चर्चा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत आमदार खताळ यांनी नागरिकांना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. सरकार या प्रश्नावर सकारात्मक असून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकल्पाचे राजकारण काही जणांकडून केले जात असल्याची टीका करत आमदार खताळ म्हणाले की, हा रेल्वेमार्ग 2023-24 मध्ये नव्हे तर 2000 सालीच व्हायला हवा होता. त्यावेळी प्रकल्पाचा खर्चही कमी होता. तरीही उशिरा का होईना, नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा यासाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.