Malegaon Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Road Issue : काय सांगता ! मालेगावमधील दीड कोटींचा रस्ता चक्क हरवला; दुर्बिणीतून शोधाशोध सुरू...

संपत देवगिरे

Malegaon Political News : मालेगाव शहरातील बडा कब्रस्तान परिसरातील सुलेमानी चौक ते इसाकशेठ जरवाला कंपाउंडदरम्यान रस्त्याचे काम झाले नाही. मात्र, या रस्त्याच्या नावाखाली एक कोटी ३३ लाखांचे बिल काढण्यात आले. त्यामुळे हा रस्ता आता हरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. हरवलेला रस्ता शोधण्यासाठी एसडीपीआय, लोक संघर्ष समितीने शहरभर दुर्बीण लावून शोध मोहीम राबवून अनोखे आंदोलन केले. या प्रकारामुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला असून, शहरात रस्त्याचीच चर्चा सुरू आहे. (Latest Political News)

शहरातील बडा कब्रस्तान परिसरातील सुलेमानी चौक ते इसाकशेठ जरवाला कंपाउंड (मशरिकी इकबाल रोड) या भागातील रस्ता आणि गटारीच्या कामासाठी २०१६ मध्ये निविदा काढली होती. मात्र, हा रस्ता झाला नाही किंवा गटारीचे कामही करण्यात आले नाही. तसेच प्रत्यक्षात हे काम करताना कोणीही पाहिले नाही. असे असतानाही ठेकेदाराने मात्र एक कोटी ३३ लाखांचे काम केल्याचे दाखवून बिल काढले. (Maharashtra Political News)

रस्ता आणि गटाराचे काम झाले नसतानाही बिल कसे काय काढले, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. रस्ता व गटारींचा शोध घेण्यासाठी एसडीपीआय व लोकसंघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. सायकल व रिक्षावर दुर्बीण लावून परिसरात फिरून रस्त्याचा शोध घेत जनजागृती करण्यात आली. मात्र, त्यांना ना रस्ता मिळाला ना गटार. दरम्यान, या आंदोलनाची चर्चा शहरभर चांगलीच रंगली होती. (Malegaon News)

'एसडीपीआय'चे अध्यक्ष राहील हनिफ म्हणाले, 'या रस्त्यासंदर्भातील माहिती अधिकारात माहिती मिळवली. त्यावेळी बिल काढल्याचे समजले. राहुल कन्स्ट्रक्शनच्या नावाने हे बिल अदा करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र ना रस्ता, ना गटाराचे काम झाले. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी,' अशीही मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात लोक सघंर्ष समितीचे अध्यक्ष सलिम अहमद, लुकमान अन्सारी, इब्राहिम इन्कलाबी, उस्मान अन्सारी, अझहर अस्लम, आरिफ सत्तार, अब्दुल खान आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT