Nashik Political News : भाजप विरोधकांवर जाहीरपणे घराणेशाहीचा आरोप करत असले तरी नाशिकच्या भाजपमध्येच परिवारवाद उफाळून आला आहे. आमदारांच्याच आप्तस्वकीयांना महत्त्वाची पदे देण्यात आल्याने हा वाद थेट प्रदेशाध्यक्षांकडे पोहोचला आहे. यावर भाजप नेते काय तोडगा काढणार, याकडे आता नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (Latest Political News)
नाशिक शहराची भाजप कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात आमदार व पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक व जवळच्याच लोकांना स्थान मिळाल्याची तक्रार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांकडून तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर भाजपश्रेष्ठी काय मार्ग काढणार, याची चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरोधी पक्षांच्या घराणेशाहीवर बोट ठेवून कायम वार करत असतात. असे असतानाही नाशिक शहरात घोषित केलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत नेमके भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनाच स्थान दिल्याचा आरोप होत आहे. यावर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने अंतर्गत धुसफूस समोर आली.
नाशिक भाजपच्या या भूमिकेमुळे नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांसह ज्यांना डावलले गेले, त्यांच्यातही असंतोष निर्माण झाला आहे. आमदार, पदाधिकाऱ्यांनी आपल्याच नातेवाइकांना पदे दिल्याने हा वाद प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि नाशिकचे प्रभारी व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात पोहोचला आहे. आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवरच नाशिक भाजपमधील कार्यकर्ते निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
नीतिमूल्ये गुंडाळल्याचा आरोप
भाजपची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी नुकतीच जाहीर केली. शहर कार्यकारिणी जाहीर करताना सर्वसमावेशक, सोशल इंजिनिअरिंगचा मेळ साधने अपेक्षित होते. परंतु, जाहीर कार्यकारिणीने पक्षासमोर फार चांगले वातावरण असेल, याची शाश्वती पुसट झाली आहे. कार्यकारिणी जाहीर करताना पक्षाची ध्येयधोरणे, नीतिमूल्ये गुंडाळण्यात आल्याचा आरोप होत आहे.
वर्षानुवर्षे ज्यांच्या घरात सत्तेची पदे आहेत, त्यांच्या आप्तस्वकीयांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. कार्यकारिणीत भौगोलिक समतोल राखण्यातही अपयश आले आहे. नाशिक रोड विभागातून १२ नगरसेवक भाजपसाठी निवडून दिले होते, असे असताना संघटनेच्या महत्त्वाच्या पदांवर स्थान मिळाले नाही. संघटनेतच असंतोष निर्माण झाल्याने लोकसभेसह त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढताना प्रथम घरातील लढाईचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Political News)
घराणेशाहीवर शिक्कामोर्तब
शहर कार्यकारिणी जाहीर करताना परिवार वादावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या कन्या संध्या कुलकर्णी यांना उपाध्यक्ष, तर आमदार डॉ. राहुल आहेर व माजी जिल्हाध्यक्ष केदार आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे दीर सुनील फरांदे यांना सरचिटणीसपद देण्यात आले. लक्ष्मण सावजी यांच्या नातेवाईक असलेल्या सुजाता जोशी तसेच (कै.) बंडोपंत जोशी यांचे पुत्र देवदत्त जोशी, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने यांचे पुत्र माजी नगरसेवक अजिंक्य साने यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
दहा नगरसेवकांची घुसखोरी
संघटना व सत्तेतील पदे स्वतंत्र असावीत, असे भाजपचे धोरण आहे. शहराध्यक्षपदाची निवड करताना खासदार किंवा आमदार नसावा, ही अट टाकण्यात आली होती. असे असताना कार्यकारिणीत तब्बल दहा नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. माजी नगरसेवक कुणाल वाघ, सतीश सोनवणे, ॲड. श्याम बडोदे, सुनील खोडे, बाजीराव भागवत, शरद मोरे, राकेश दोंदे या नगरसेवकांच्या तसेच धनंजय माने यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत असंतोष वाढला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.