Shivsena UBT NMC News: विधानसभा निवडणुकीत मतदारयादीतील गोंधळ उघड झाला आहे. यावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप आणि हरकती घेतल्या. मात्र निवडणूक आयोग मात्र पुन्हा कालचा गोंधळ बरा होता या मार्गाने चालला आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदारयादीत धक्कादायक त्रुटी उघडकीस आले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी त्याचा पुराव्यासह पंचनामा केला. याबाबत प्रशासनाला त्यांनी थेट इशारा देत, आक्षेप घेतला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने मतदार यादीतील त्रुटी उघड केल्या जात आहेत. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्वक यातील गोंधळ उघड केला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजप सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केला होता.
मात्र यापासून राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन बोध घेण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुकीतील गोंधळाचा दुसरा अंक महापालिका निवडणुकीत होत आहे. संदर्भात शिवसेना शिंदे पक्षानेही मतदारसंघ निहाय बनावट नावे उघड केली आहेत. आता शिवसेना ठाकरे पक्षाने या यादीचा पंचनामा केला.
महापालिका निवडणूक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन इशारा देण्यात आला. उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, प्रथमेश गीते, सचिव मसुद जिलानी यांनी याबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
महापालिका मतदार यादीत श्याऐंशी हजार ६८८ दुबार नावे आहेत. शहरातील चार विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५३ हजार सदोष नावे आहेत. पूर्व मतदारसंघात तेरा हजार ६८८, मध्य मतदारसंघात नऊ हजार ६४१, देवळाली मतदारसंघात आठ हजार ५२८ नावे अन्य प्रभागात स्थलांतरित केली आहेत. ही संख्या केवळ पंचवीस टक्के मतदारयादीतील तपासणीत आढळली.
या त्रुटी दूर केल्याशिवाय निष्पक्ष निवडणुका होऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोग संशयास्पद वागत आहे. अवघ्या सात दिवसात मतदारयादीची तपासणी अशक्य आहे. त्यामुळे वेळ वाढवावी. राजकीय पक्षांची स्वतंत्र बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
महापालिका निवडणुकीतील प्रशासनावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. यासंदर्भात मतदारयादीतील घोळ हा गंभीर विषय आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आक्षेप घेतले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधीच वादाचे राजकीय फटाके वाजू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.