Digital Twin Technology Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये भाविकांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आंतरविभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत गर्दीची स्थिती, भाविकांची वाहतूक, उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित माहिती एकाच डिजिटल प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच संभाव्य समस्यांचा आधीच अंदाज घेऊन विविध विभागांना समन्वयाने निर्णय घेणे शक्य होणार आहे.
डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर करून कुंभमेळ्याशी संबंधित प्रमुख ठिकाणे, घाट, रस्ते, वाहनतळ, होल्डिंग एरिया आणि अन्य सुविधांची आभासी प्रतिकृती तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली. या प्रतिकृतीच्या आधारे संबंधित ठिकाणांवरील गर्दीची स्थिती, वाहतुकीचा प्रवाह आणि पायाभूत सुविधांवरील संभाव्य ताण यांचा अभ्यास करता येणार आहे. एखादी परिस्थिती निर्माण झाल्यास तिचा आसपासच्या भागांवर काय परिणाम होऊ शकतो, याचेही आधीच आकलन करता येईल. संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार सूचना आणि अलर्ट पाठविण्याची व्यवस्था असेल. वेळेत कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ स्तरावर त्याची माहिती पोहोचविण्याचीही तरतूद प्रस्तावित आहे.
प्रस्तावित प्रणालीची रचना, सध्याच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरशी (आयसीसीसी) तिचे एकत्रीकरण, तंत्रज्ञान आणि अंमलबजावणीसाठी भागीदारांची निवड तसेच प्रायोगिक तत्त्वावर (प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट) प्रणालीची चाचणी घेण्याबाबतही चर्चा झाली. प्रत्यक्ष वापरापूर्वी प्रणालीची अचूकता, कार्यक्षमता आणि उपयुक्तता तपासण्यावरही भर देण्यात आला.
या कार्यशाळेला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे व उदय किसवे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश भदाणे, पोलिस उपायुक्त किरण चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि तज्ज्ञ सल्लागार उपस्थित होते.
पुराच्या संभाव्य धोक्याचा आधीच अंदाज घेऊन घाट रिकामे करण्याचे नियोजन
डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल, हे स्पष्ट करताना संभाव्य पूरस्थितीत भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे उदाहरण देण्यात आले. पावसाची नोंद आणि धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यांची माहिती एकत्रित केल्यास कोणत्या घाटांवर पुराचे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे, याचा आधीच अंदाज घेता येईल. त्यानुसार संबंधित घाटांवरील भाविकांची संख्या, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी लागणारा कालावधी आणि उपलब्ध पर्यायी मार्गांचा आढावा घेऊन स्थलांतराची पूर्वतयारी करता येणार आहे.
याअंतर्गत घाटांकडे येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, पर्यायी मार्ग निश्चित करणे आणि होल्डिंग एरियामधून भाविकांना सोडण्याचे प्रमाण कमी करणे किंवा गरजेनुसार त्यांची वाहतूक तात्पुरती थांबविणे शक्य होईल. तसेच परिस्थितीनुसार वाहनतळ आणि बससेवेचेही नियंत्रण करता येणार आहे. होल्डिंग एरियामधून घाटांकडे पाठविले जाणारे भाविक आणि घाटांवरील गर्दी यांचा समन्वय राखण्यावर विशेष भर असेल. यामुळे धोकादायक ठिकाणी गर्दी वाढण्यास प्रतिबंध करता येईल आणि आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल.
गर्दी आणि वाहतूक कोंडीचा आधीच अंदाज घेणे शक्य
घाट, प्रमुख रस्ते, अरुंद गल्ल्या आणि होल्डिंग एरिया अशा गर्दी होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवरील भाविकांची संख्या आणि त्यांच्या हालचालींवर डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवता येणार आहे. एखाद्या परिसरात गर्दी वाढू लागल्यास त्याचा आसपासच्या भागांवर होणारा परिणाम आधीच ओळखून आवश्यक उपाययोजना करणे शक्य होईल. गर्दीच्या प्रमाणानुसार होल्डिंग एरियामधून भाविकांना सोडण्याचे नियोजन, प्रवेशावर नियंत्रण आणि पर्यायी मार्गांवरून भाविकांना वळविण्याबाबत निर्णय घेता येतील.
वाहतूक नियोजनामध्ये महामार्गावरील वाहनतळापासून घाटांपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचा विचार करण्यात आला. उपलब्ध वाहनतळांची क्षमता आणि येणाऱ्या वाहनांची संख्या यांची तुलना करून वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आधीच ओळखता येईल. त्यानुसार प्रमुख चौकांमधील वाहतूक वळविणे, आवश्यक ठिकाणी वाहनांना तात्पुरते थांबविणे आणि पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
एखादा घाट बंद करावा लागल्यास त्याचा बससेवा, वाहनतळ आणि परिसरातील वाहतुकीवर काय परिणाम होईल, याचे आभासी विश्लेषण करण्याची संकल्पनाही मांडण्यात आली. अशा प्रकारच्या 'व्हॉट इफ' विश्लेषणामुळे प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था निश्चित करता येईल.
एका ठिकाणच्या निर्णयाचा संपूर्ण व्यवस्थेवर होणारा परिणाम समजणार
कुंभमेळ्यातील विविध सुविधा एकमेकांशी जोडलेल्या असल्याने एका ठिकाणी निर्माण झालेल्या समस्येचा परिणाम इतर ठिकाणांवरही होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादा घाट रिकामा करण्याची वेळ आल्यास तेथील भाविकांची हालचाल थांबवावी लागू शकते. परिणामी होल्डिंग एरिया भरू शकतात, शटल बससेवा थांबवावी लागू शकते आणि वाहनतळांवरील वाहनांच्या रांगा महामार्गापर्यंत पोहोचू शकतात.
सध्या प्रत्येक विभाग प्रामुख्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवतो. मात्र, डिजिटल ट्विन प्रणालीमुळे अशा घटनांची एकमेकांशी असलेली सांगड आणि त्यातून निर्माण होणारे परिणाम एकाच वेळी समजण्यास मदत होईल. त्यानुसार होल्डिंग एरियामधून भाविकांना सोडणे थांबविणे, वाहनतळांवर शटल बस थांबविणे किंवा महामार्गावरील तपासणी नाक्यांवर वाहनांची वाहतूक नियंत्रित करणे, अशा उपाययोजना संबंधित विभागांना समन्वयाने करता येतील.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिवृष्टी, धरणांतून पाण्याचा विसर्ग, घाट परिसरातील संभाव्य पूरस्थिती यांसह आग किंवा स्फोटासारख्या आपत्कालीन घटनांमध्ये या प्रणालीचा उपयोग करण्याबाबतही चर्चा झाली. अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग, पर्यायी प्रवेशमार्ग आणि गर्दी व वाहतुकीवर होणारे संभाव्य परिणाम यांचे आधीच आभासी पद्धतीने विश्लेषण करता येणार आहे.
यासाठी नव्याने स्वतंत्र यंत्रणा उभारण्याऐवजी प्रशासनाकडे आधीपासून उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. सीसीटीव्ही यंत्रणा, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) आणि विविध विभागांकडील माहिती प्रणाली यांचे प्रस्तावित डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्मशी एकत्रीकरण करण्याबाबत विचारविनिमय झाला. विविध विभागांकडील माहितीचे एकत्रित विश्लेषण करून तिचा प्रत्यक्ष नियोजन आणि निर्णयप्रक्रियेसाठी उपयोग करण्यावर भर देण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक स्वरूपाचा आणि प्रत्यक्ष व्यवस्थापनातील गरजांचा विचार करून प्रस्तावित प्रणाली अधिक उपयुक्त करण्यासाठी सहभागी विभागांच्या प्रतिनिधींनी सूचना मांडल्या. गर्दी, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी सर्व यंत्रणांना एकाच माहितीच्या आधारे समन्वयाने कार्यवाही करता यावी, हा या डिजिटल प्रणालीमागील मुख्य उद्देश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.