Mahant Sanjaydas Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela Muslim participation: नाशिक कुंभमेळ्यात मुस्लिमांच्या सहभागावरून नवा मुद्दा; महंत संजयदास म्हणाले, ‘परंपरा सर्वसमावेशक’

Nashik Kumbh Mela preparations face delays as Mahant Sanjaydas comments on Muslim participation, Ramkund issues and Sadhu Gram land acquisition : कुंभमेळ्यात मुस्लिमांच्या सहभागावर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास यांनी सर्वसमावेशक भूमिका स्पष्ट केली आहे.

Sampat Devgire

Nashik Kumbh Mela Mahant Sanjaydas News : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असतानाही नाशिकमधील अनेक विकासकामे अद्याप अपूर्ण आहेत. रामकुंडावरील अमृतस्नानाच्या व्यवस्थेत तांत्रिक त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. कामांची संथ गती आणि साधू ग्रामसाठीच्या भूसंपादनातील विलंबामुळे कुंभमेळ्याच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अशातच, कुंभमेळ्यात मुस्लिमांनी सहभागी होऊ नये आणि भाविकांनी मुस्लिम दुकानदारांकडून साहित्य खरेदी करू नये, अशी भूमिका मंत्री नीतेश राणे यांनी मांडल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास यांनी सर्वसमावेशक भूमिका स्पष्ट केली आहे.

‘सनातन आणि हिंदू धर्माचा प्रवाह सर्वव्यापी आहे. या परंपरेत हिंदूंबरोबरच मुस्लिम (Muslim) आणि अन्य धर्मीय नागरिकही शुद्ध मनाने सहभागी होऊ शकतात. ही परंपरा प्रदीर्घ काळापासून सुरू आहे,’ असे महंत संजयदास यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे मंत्री नीतेश राणे यांच्या विधानांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर मिळाल्याची चर्चा आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध आखाड्यांचे प्रमुख महंत नाशिकमध्ये दाखल होऊ लागले आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास हेही मंगळवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना कुंभमेळ्याच्या तयारीबाबत भूमिका मांडली.

कुंभमेळ्याच्या नियोजनात साधू ग्रामला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे प्रशासनाने साधूंसाठी नियोजित केलेले भूखंड आणि साधू ग्रामची जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा महंत संजयदास यांनी व्यक्त केली. आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास यांच्यासह विविध साधू नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. बुधवारी सायंकाळी महापालिका, कुंभमेळा आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असून, कार्यक्रमस्थळाचीही पाहणी करण्यात येणार असल्याचे महंत संजयदास यांनी सांगितले.

रामकुंडावरील तांत्रिक त्रुटी

कुंभमेळ्यातील अमृतस्नान ज्या रामकुंडावर होणार आहे, तेथील पायऱ्यांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे महंत संजयदास यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय शहरातील अनेक विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. या कामांचा वेगही अपेक्षेच्या तुलनेत संथ असल्याने त्याचा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांच्या भूमिकेतून व्यक्त झाली.

गोदाआरतीसाठी शैव-वैष्णव साधू एकत्र

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित गोदाआरतीमध्ये शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांचे साधू एकत्र सहभागी होणार आहेत. या घडामोडीबद्दल महंत संजयदास यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे स्थळ आणि दोन्ही पंथांतील साधूंमधील अंतर लक्षात घेता, अन्य उपक्रमांसाठीही दोन्ही पंथांचे साधू एकत्र येतील, अशी शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

अन्यथा साधू शेतकऱ्यांच्या बाजूने

साधू ग्रामसाठीचे भूसंपादन अद्याप सुरू झालेले नाही. यापूर्वीच्या भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी महंत संजयदास यांनी केली. शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत प्रशासनाने विलंब केल्यास साधू शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच साधू ग्रामच्या भूसंपादनाचा आणि शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT