Environmental activists and political leaders opposing the proposed tree cutting at TapoVan, Nashik, as BJP minister Girish Mahajan remains firm on clearing land for Kumbh Mela arrangements. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या हट्टामुळे भाजप एकाकी : शिवसेना, राष्ट्रवादीची 'तपोवन वादात' भूमिका क्लिअर!

Nashik Kumbh Mela : तपोवन परिसरातील झाडतोडीच्या प्रस्तावावर भाजप एकाकी पडले असून शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही विरोध दर्शवला आहे. गिरीश महाजन मात्र हट्टावर ठाम असून राजकीय तणाव वाढला आहे.

सरकारनामा ब्यूरो

TapoVan tree cutting : कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या वादात भाजप अक्षरशः एकाकी पडला आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही या वृक्षतोडीला विरोध केल्याने भाजपची कोंडी झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यानंतरही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे या वृक्षतोडीवर ठाम असून त्यांनी हैदराबाद येथे जाऊन 15 हजार झाडे खरेदी केली आहेत. लवकरच ती नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

कुंभमेळ्यात येणाऱ्या साधुंच्या साधूग्रामसाठी तपोवन परिसरातील 54 एकरवरील चिन्हांकित 1825 पैकी किमान एक हजार झाडे तोडावी लागणार आहेत. या वृक्ष तोडीला नाशिकमधून प्रचंड विरोध होत आहे. याच विरोधात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने सूर मिसळला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनमध्ये जाऊन या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही वृक्षतोड चुकीची असल्याचे मत मांडले.

यानंतर आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या कुंभमेळा मंत्री उपसमितीतही मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडावे लागतील, यावर चर्चाच झाली नसल्याचे मंत्री, उपसमिती सदस्य दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याची आवश्यकता नाही. नियोजनात अडचणच होत असेल तर, बोटांवर मोजता येतील इतक्या झाडांबाबत नव्या तंत्राने पुनर्रोपणासारख्या पर्यायावर विचार करता येईल, असे त्यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी-शिवसेनेने उट्टे काढले?

सुरुवातीपासून कुंभमेळा नियोजनावर भाजपचा वरचष्मा असल्याचा आरोप दोन्ही मित्रपक्षांकडून सुरु होता. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा मंत्री उपसमितीत स्थापन करण्यात आली. यात राष्ट्रवादीकडून (NCP) छगन भुजबळ आणि अॅड. माणिकराव कोकाटे, शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत, तर भाजपकडून जयकुमार रावल आणि शिवेंद्रसिंह भोसले यांना समितीवर स्थान देण्यात आले.

पण मंत्री उपसमिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकच बैठक झाली आहे. अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर होतात, कुंभमेळ्यासाठी स्थापन केले प्राधिकरणही गिरीश महाजन यांच्याच कह्यात आहे, असे आरोप दबक्या आवाजात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते करत आहेत. याच वादानंतर आता वृक्षतोडीमुळे अडचणीत आलेल्या भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने (Shivsena) आणखी अडचणीत टाकल्याचे बोलले जाते. यामागे पालिका निवडणुकीत मायलेज मिळविण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT