Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आमदार किशोर दराडे विजयी झाले. ही लढत दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांत वाटत होती. मात्र, अनपेक्षितपणे दमदार लढत देत विवेक कोल्हे यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सहकार आणि शिक्षण क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी केली. ऐनवेळी निवडणुकीत उतरण्याचा त्यांचा निर्णय होता. तरीही त्यांनी दिलेली लढत ही निवडून आलेल्या दराडे यांना घाम फोडणारी होती. या निमित्ताने विवेक कोल्हे यांची राजकीय 'एन्ट्री' झाली आहे.
या निवडणुकीत शिवसेना ( Shivsena ) शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांना विजयासाठी एकोणिसाव्या फेरीपर्यंत झुंजावे लागले. त्यांना 32 हजार 399 मते मिळाली. दुसऱ्या स्थानी अपक्ष विवेक कोल्हे यांना 24 हजार 386 मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे तिसऱ्या स्थानी राहिले.
निवडक मतदार असल्याने या व्यापक मतदारसंघात अतिशय कमी वेळेत आपली यंत्रणा पोहोचविण्याचा आदर्श कोल्हे यांनी करून दाखवला. कोणताही पक्ष पाठीशी नसताना या युवकाने राज्याचे राज्यकारण आपल्या भोवती फिरवून दाखवले. त्यामुळे कधीच प्रचारात न फिरलेल्या विरोधकांना शिक्षकांचे पत्ते शोधत प्रचार करावा लागला
आमदार किशोर दराडे आणि संदीप गुळवे गेले सहा महिने निवडणुकीची तयारी करत होते. त्या तुलनेत विवेक कोल्हे यांनी अवघ्या 25 दिवसांत शेकडो युवकांना प्रचारात उतरवून संघटन कौशल्य आणि प्रभावी नियोजनाचे उदाहरण सादर केले. दुसऱ्या क्रमांकाची प्रभावी मतदान त्यांना झाले.
यानिमित्ताने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांची तिसऱ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. विवेक कोल्हे हे अतिशय युवा आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी आता प्रवेश केला आहे. त्यांच्या परभावासाठी मुख्यमंत्र्यांसह राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, गिरीश महाजन असे सहा मंत्री प्रचारात उतरले होते. त्यामुळे आगामी राजकारणासाठीचे बाळकडू कोल्हे यांना निश्चितच मिळाले आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी थेट प्रचारात भाग घेतला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी भाग घेणे पहिल्यांदाच घडले. महायुतीच्या चार मंत्री आणि जवळपास वीस आमदारांनी अप्रत्यक्षपणे महायुतीचे किशोर दराडे यांच्यासाठी काम केले.
या निवडणुकीत शिक्षण संस्था प्रमुख भूमिका बजावतात. त्यामुळे सहजिकच सत्तेचा प्रभाव त्यात पडला. त्याचा लाभ आमदार किशोर दराडे यांना मिळाला. ते दुसऱ्यांदा आमदार झाले. आता आमदार दराडे शिक्षकांचे कोणते प्रश्न व कशा प्रकारे मांडतात याची शिक्षकांनाही उत्सुकता असेल. शिक्षक मतदार असलेल्या या निवडणुकीत यंदा जे जे घडले ते शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासाठी प्रतिष्ठा वाढविणारे नक्कीच नव्हते. समाजाला दिशा देण्याची आणि नवी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांकडे पाहण्याचा सामान्य नागरिकांचा दृष्टिकोन कदाचित यामुळे बदलू शकतो.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.