Nashik News : राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी संवर्गाची भरती राज्य शासनाने रोखली आहे. खुल्या वर्गाची भरती झाली. आदिवासी उमेदवार मात्र ताटकळत बसले आहेत. गेले दोन आठवडे या विषयावर आपल्या मागण्यांसाठी राज्यभरातील आदिवासी तरुण नाशिकला आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात राज्य शासनाला थेट इशारा देणारा 'ऊलगुलान' मोर्चा काढण्यात आला. त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता हजारो आदिवासी बांधव शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून आदिवासी विकास विभागापुढे ठिय्या देत बसले आहेत. हे आंदोलन सुरू असताना शहरात लाडकी बहीण योजना प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) नाशिकला येऊन गेले. त्यावेळी ज्येष्ठ आदिवासी नेते माजी आमदार जे. पी. गावित उपोषणाला बसले होते. मात्र, त्याकडे या मंत्र्यांनी दुर्लक्ष केले. (VijayKumar Gavit News)
मंगळवारी या संदर्भात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला पाठिंबा जाहीर केला. हे सर्व नेतेही आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता या विषयावर हजारो आदिवासींनी नाशिकची दळणवळण यंत्रणा ठप्प केली. त्यामुळे प्रशासनाच्या अहवालाने आदिवासी विकासमंत्र्यांना जाग आली. आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेतली.
मंत्री डॉ. गावित यांनी आंदोलकांशी तासभर चर्चा केली. ही चर्चा अद्यापही सुरूच आहे. काय ठोस निर्णय होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे. रस्त्यावर उतरलेल्या आदिवासींना त्यांच्याच मंत्र्याबाबत मात्र अजिबात आपुलकी दिसून आली नाही. शहरात मुसळधार पाऊस होत होता. वादळी वारे होते. नदीला पूर आला होता.
या स्थितीत ऊन पाऊस वाऱ्यात आदिवासी आंदोलन करीत होते. मात्र, आदिवासी विकास विभागाने त्याची फारशी दखल घेतली नाही. आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित त्याकडे फिरकलेही नाहीत. त्यासंदर्भात या आंदोलकांत संताप आहे. शेवटी आंदोलनाचा दबाव निर्माण झाल्यावरच मंत्री गावित आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार गावित यांच्या भेटीला आले. भास्कर गावित, चिंतामण गावित, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे यांसह विविध नेत्यांनी या आंदोलनाला समर्थन दिले होते. या दबावामुळे आदिवासी विकास मंत्री आंदोलकांच्या भेटीला आले.
त्यामुळे मंत्र्यांच्या या भेटीला आंदोलनाचा दबाव कारणीभूत ठरला आहे. आदिवासी विकास मंत्री आदिवासींच्या प्रश्नांसाठी असतात. एवढे दिवस ते का आले नाही. हा संताप समाजाच्या युवकांमध्ये आहे. त्याचे उत्तर मंत्री गावित यांना द्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.