Nitesh Rane News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitesh Rane: ठाकरे गटाविरोधात नितेश राणेंना 'दारूगोळा' कोण पुरवतो? नाशिकमधील नेत्यांचे टेन्शन वाढले

Sampat Devgire

Nitesh Rane News : भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात गुरुवारी (ता.4) सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक सय्यद मुशिर यांनी कब्रस्तानच्या जागेवर इमारत बांधल्याचा आरोप त्यांनी केला. या इमारतीसाठी एका कार्यकारी अभियंत्याने नियम बाजूला सारून परवानगी दिल्याचा दावा त्यांनी केला.

राणे यांनी माजी नगरसेवक सय्यद यांचा विषय मांडला. त्यात त्यांना मूशीर यांचे पूर्ण नाव देखील माहीत नसावे असे जाणवत होते. राणे देत असलेली माहिती वरवरची असल्याचे जाणवत होते. त्यामुळे राणे यांना ठाकरे गटा विरोधात माहिती देणारे नाशिकचे कोण लोक असावेत, याची चर्चा सुरू झाली आहे.

नितेश राणे Nitesh Rane यांनी माजी नगरसेवक सय्यद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना एकाच दिवसात विविध परवानग्या कशा मिळाल्या? असा प्रश्नही उपस्थित केला. याबाबत येत्या दोन आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र, आमदार राणे यांनी थेट कारवाईचे आदेश द्यावेत. ही इमारत पाडून टाकावी, असा आग्रह राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात धरला.

आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी शिवसेना Shivsena ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विषयी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सोबत पार्टी केल्याचा फोटो विधानसभेत झळकावला होता. त्यानंतर अनेक दिवस बडगुजर यांच्या मागे पोलिसांचा ससेमीरा लागला होता. एकंदरच आमदार राणे नाशिक मधील ठाकरे गटाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याची संधी सोडत नाहीत, असे दिसून येत आहे.

नाशिकच्या नेत्यांविरोधात आमदार राणे यांचा उपयोग करून घेणारे कोण? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ठाकरे गटातील काही नेत्यांनीही हा प्रश्न खासगीत उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकचे राजकारण अधिक गढूळ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये याच विषयाची चर्चा होत आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT