Sudhakar Badgujar- Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nasik Constituency 2024 : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांची तडीपारी !

Eknath Shinde Politics, Police issued notice to Thackeray group's Badgujar : बहुचर्चित सलीम कुत्ता प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या प्रचारात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

Sampat Devgire

Shivsena UBT News : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी चुरस आहे. निवडणुकीतील ही चुरस आता परस्परांच्या नेत्यांवर सूड उगवण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार अधिक टोकदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला गुरूवारी वेगळे वळण लागले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे प्रचार प्रमुख असलेल्या सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी ही नोटीस बजावली आहे. बहुचर्चित सलीम कुत्ता प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या प्रचारात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या नेत्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरे गटावर मनसोक्त टीका केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सलीम कुत्ता प्रकरणाच्या चौकशीत मुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष आहे, असे सूचक विधान केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच नाशिक पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्यामुळे ही कारवाई राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिक (Nashik) मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना दुसरे इच्छुक विजय करंजकर यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला, अशी खंत करंजकर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे जे नेते शिंदे गटात गेले आहेत ठाकरे गटाच्या नेत्यांवर राजकीय सूड उगवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनीही हे गृहीत धरून प्रचारात आघाडी घेतली आहे.

दरम्यान, या संदर्भात तडीपारीची नोटीस बजावलेले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी बजावलेली नोटीस मिळाल्यानंतर त्याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहोत. ज्या प्रकरणाचा उल्लेख केला जात आहे. ते अतिशय जुने प्रकरण आहे. त्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही. त्याबाबत आपली यापूर्वी चौकशी देखील झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT